अमेरिकेकडून घोषणा : बांगलादेशलाही मोठी सूट
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेने पाकिस्तानवर फक्त 19 टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा शुक्रवारी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधीची माहिती जारी केली आहे. दक्षिण आशियातील कोणत्याही देशावर असलेला हा सर्वात कमी अमेरिकन कर असेल. एप्रिलच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के आणि पाकिस्तानवर 29 टक्के कर लादण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, नवीन आदेशात ट्रम्प यांनी भारताला फक्त 1 टक्का तर पाकिस्तानला 10 टक्के इतकी मोठी सूट दिली आहे.
अमेरिकेच्या टॅरिफ यादीत भारतावर 25 टक्के टॅरिफ लागू आहे, तर पाकिस्तानसाठी तो 29 टक्क्यांवरून 19 टक्के करण्यात आला आहे. भारताच्या शेजारी बांगलादेशसाठी देखील टॅरिफ दर कमी करण्यात आले आहेत. बांगलादेशचा टॅरिफ 35 वरून 20 टक्के करण्यात आला आहे. या टॅरिफ यादीत 80 हून अधिक देश आणि प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे. सुधारित कार्यकारी आदेश जारी झाल्यानंतर सात दिवसांनी हे दर लागू होतील.
गेल्या दोन दिवसात डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला 2 सवलती दिल्या आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल आणि व्यापार कराराची घोषणा केली होती. याअंतर्गत अमेरिका पाकिस्तानमध्ये तेल शोध, प्रक्रिया आणि साठवणुकीत मदत करणार आहे. त्यानंतर आता आयात शुल्कातही मोठी सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध खूप जवळचे झाले आहेत.
पाकिस्तानचे भौगोलिक स्थान अमेरिकेसाठी खूप महत्वाचे आहे. त्याच्या सीमा अफगाणिस्तान आणि इराणशी लागलेल्या आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात दोन्ही संवेदनशील देश आहेत. अमेरिका अजूनही अफगाणिस्तानवर लक्ष ठेवू इच्छिते. पाकिस्तान यासंदर्भात लॉजिस्टिक्स बेस किंवा मॉनिटरिंग पॉइंट म्हणून काम करू शकतो. त्यामुळेच अमेरिका पाकिस्तानचा योग्य वापर करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.









