वृत्तसंस्था / दुबई
येथे सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी अ गटातील पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यात महत्त्वाचा सामना खेळविला जाणार आहे. मैदानाबाहेरील घडामोडीमुळे मानसिकदृष्ट्या अस्थिर झालेल्या पाक संघाची या सामन्यात सत्त्वपरीक्षा होणार आहे.
या स्पर्धेतील पाकचा भारताबरोबरचा सामना रविवारी खेळविण्यात आला होता आणि या सामन्यात भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. तशातच भारतीय संघातील खेळाडूंनी सामना संपल्यानंतर पाक खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याचे टाळल्याने उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. या स्पर्धेतील सामनाधिकारी झिम्बाब्वेचे पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी पाक संघाने केली. पायक्रॉफ्टना स्पर्धेतून काढून टाकले नाही तर पाक संघाने या स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिल्याचे वृत्त पाक प्रसारमाध्यमाने प्रसिद्ध केले. पण आयसीसीने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. या स्पर्धेतील पाकचा बुधवारचा हा अ गटातील शेवटचा सामना असून या सामन्यात पायक्रॉफ्ट हे सामनाधिकारी म्हणून राहतील.
पाक संघातील खेळाडू मानसिकदृष्ट्या विचलित झाले आहेत. या स्पर्धेमध्ये पाक संघाने आतापर्यंत आपल्या गटात एक सामना जिंकला असून एक सामना गमविला आहे. त्यामुळे ते आता अ गटातून दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. संयुक्त अरब अमिरातने या गटात दोन गुण मिळविले आहेत. पण सरस धावसरासरीमध्ये पाकने अमिरातला मागे टाकले आहे. बुधवारच्या सामन्यात अमिरातने विजय मिळविल्यास पाक संघाचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत पाक संघाने पहिल्या सामन्यात नवख्या ओमानचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. पण त्यानंतर विश्वविजेत्या भारताबरोबरच्या सामन्यात पाकची फलंदाजी भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर साफ गोलमडली. कुलदीप यादव आणि अक्षय पटेल या फिरकी गोलंदाजांनी पाकचे पाच फलंदाज बाद केले. त्याच प्रमाणे फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती समोरही पाकचे फलंदाज झगडत असल्याचे दिसून आले. पाक संघातील सईम आयुब, साहीबजादा फरहान, हसन नवाज यांना आपला खेळ सुधारावा लागेल.
या स्पर्धेत भारतीय संघाने यापूर्वी सुपर-4 मधील आपले स्थान निश्चित केले आहे. आता संयुक्त अरब अमिरातला सुपर-4 फेरी गाठण्याची नामी संधी मिळाली आहे. कारण बुधवारच्या सामन्यात विचलित झालेल्या पाक संघाला पराभूत करण्याची संधी त्यांना लाभली आहे. पाकची गोलंदाजी भारताबरोबरच्या सामन्यात म्हणावी तशी प्रभावी आणि भेदक वाटली नाही. सलामीचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा तसेच कर्णधार सुर्यकुमार यादव यांनी पाक संघातील शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर आक्रमक फटकेबाजी केली. फिरकी गोलंदाज आब्रार अहमद भारताविरुद्धच्या सामन्यात थोडाफार चांगली गोलंदाजी करु शकला. मोहम्मद नवाज तसेच सुफीयान मुक्कीम यांच्या फिरकी गोलंदाजीचा कस अद्याप लागलेला नाही.
संयुक्त अरब अमिरात संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ओमानचा 42 धावांनी पराभव केला. मात्र अनुभवी भारतासमोर संयुक्त अरब अमिरातला पराभव पत्करावा लागला. अमिरात संघात कर्णधार मुहम्मद वासीम आणि अलिशान शेराफू हे अनुभवी फलंदाज आहेत. तसेच जुनेद सिद्धक्की हा अमिरात संघातील अनुभवी गोलंदाज आहे. हैदर अली हा डावखुरा फिरकी गोलंदाज असून त्याला ध्रुव पराशर आणि हर्षित कौशिक यांची साथ लाभणे जरुरीचे आहे.
पाक संघ: सलमानअली आगा (कर्णधार), अब्रार अहमद, फईम अश्रफ, फखर झमान, हॅरीस रौफ, हसनअली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शहा, मोहम्मद हॅरीस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वासीम ज्युनियर, साहीबजादा फरहान, सईम आयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी आणि सुफीयान मुक्कीम.
युएई संघ: मुहम्मद वासीम (कर्णधार), अलिशान शराफू, ए. शर्मा, आसीफ खान, ध्रुव पराशर, इथेन डिसोझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दिकी, मतिउल्लाह खान, मोहम्मद फारुक, मुहम्मद जवादुल्लाह, मुहम्मद झोहेब, राहुल चोप्रा, रोहीद खान, सिमरनजित सिंग, शागीर खान
सामन्याची वेळी रात्री 8 वाजता









