वृत्तसंस्था /हैदराबाद
आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. आता या सामन्यातील पाकिस्तानचा सलामीचा सामना शुक्रवारी येथे नेदरलँडस्बरोबर होणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता प्रारंभ होईल.
अलिकडेच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पाक संघाची कामगिरी निकृष्ट झाल्याने त्यांच्यावर या स्पर्धेसाठी निश्चितच दडपण राहील. तसेच भारतात या स्पर्धेपूर्वी खेळविण्यात आलेल्या सरावाच्या दोन सामन्यातही पाकला हार पत्करावी लागल्याने त्यांच्यावर आता चांगल्या कामगिरीसाठी मानसिक दडपण निश्चितच असेल. पाक संघाच्या सलामीच्या जोडीची समस्या त्यांच्यासमोर आजही असल्याने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. पाकचा सलामीचा फलंदाज इमाम उल हक याची वनडे क्रिकेटमधील आतापर्यंतची कामगिरी निश्चितच दर्जेदार असली तरी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय खेळपट्ट्यांवर त्याला अधिक सावध फलंदाजी करावी लागेल. इमाम उल हकसमवेत फक्र झमान किंवा अब्दुल्ला शफीक यापैकी एकाची निवड केली जाईल. झमान फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. तर शफीकला विश्वचषक स्पर्धेचा फारसा अनुभव नसल्याने पाकच्या व्यवस्थापन समितीसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, इफ्तिकार अहमद यांची कामगिरी समाधानकारक होत असल्याने नेदरलँडस्विरुद्ध खेळताना पाकला अधिक धावा जमविणे कठीण जाणार नाही. हैदराबादच्या स्टेडियममध्ये सीमारेषेचे अंतर इतर स्टेडियमच्या तुलनेत कमी असल्याने त्याचा लाभ गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना अधिक होऊ शकेल. पाक संघाला जखमी नसीम शहाची उणीव या स्पर्धेत चांगलीच भासेल. हसन अली, उस्मा मीर, मोहम्मद नवाझ, शकील यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
2011 नंतर पहिल्यांदाच आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रवेश मिळविणाऱ्या नेदरलँडस् संघाचे नेतृत्त्व स्कॉट एडवर्डस् करीत आहे. या संघामध्ये कांही खेळाडूंना व्यवसायिक क्रिकेटचा अनुभव आहे. आंध्रप्रदेशमध्ये जन्मलेला एन. तेजा तसेच अष्टपैलू बेस डी लिडी हे या संघातील प्रमुख खेळाडू आहेत. मॅक्स ओ दाऊद, विक्रमसिंग, अॅकरमन, व्हॅन डेर मेर्वे, व्हॅन बिक, आर्यन दत्त हे या संघातील प्रमुख खेळाडू आहेत. नेदरलँडस्चा संघ या सामन्यात बलाढ्या पाकला कडवा प्रतिकार देण्यासाठी प्रयत्न करेल.
सामन्याची वेळ – दुपारी 2 वाजता.









