वर्ल्डकपसाठी सरकारने दिली परवानगी
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
जगभरातील तमाम क्रिकेट चाहत्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ पाठवताना ज्या अडचणी येत होत्या, त्या आता दूर झाल्या आहेत. पाकिस्तान सरकारने अखेर विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवण्यास परवानगी दिली आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी (6 ऑगस्ट) इस्लामाबाद येथे हा निर्णय घेतला. यामुळे 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाकिस्तानी संघ पुन्हा भारतात येणार आहे. यापूर्वी 2016 च्या टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता.
पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी 6 ऑगस्ट रोजी एक निवेदन जारी करून संघ भारतात पाठवण्याचा निर्णय जाहीर केला. खेळ आणि राजकारण यांची सांगड घालायची नाही आणि त्यामुळे 2023 च्या विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधित बाबींच्या मार्गावर येऊ नयेत, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, 14 ऑक्टोबरला विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.









