शाहीन शहा आफ्रिदी : कर्णधार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
12 जानेवारीपासून खेळविल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी पीसीबीने 17 जणांचा पाक संघ जाहीर केला असून यामध्ये अनेक नवोदितांना संधी देण्यात आली आहे. या मालिकेसाठी पाक संघाचे नेतृत्व शाहिन शाहा आफ्रिदीकडे सोपविण्यात आले आहे. अलिकडेच पीसीबीने नव्या निवड समितीची नियुक्ती केली होती. या निवड समितीने या आगामी मालिकेसाठी पाक संघात तीन नव्या खेळाडूंना संधी दिली आहे.
17 जणांच्या पाक संघामध्ये यष्टीरक्षक आणि फलंदाज हसीबुल्लाह, अष्टपैलू अब्बास आफ्रिदी आणि फिरकी गोलंदाज अब्रार अहमद या तीन नव्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. गेल्याच महिन्यात पीसीबीने पाकच्या टी-20 संघाचे नेतृत्व पहिल्यांदाच शाहिन शाहा आफ्रिदीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला होता. आता पाकच्या कसोटी संघाचे नेतृत्व शान मसूदकडे सोपविण्यात आले आले. भारतात झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर तत्कालीन कर्णधार बाबर आझमने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा तातडीने दिला होता. या आगामी मालिकेसाठी अष्टपैलू शदाब खान दुखापतीमुळे उपलब्ध होऊ शकणार नाही. पाकच्या संघामध्ये शाहबाज दा फरहान आणि आझम खान यांचा समावेश केल्याने पाकची फलंदाजी अधिक भक्कम होण्यास मदत होईल. 27 वर्षीय फरहानने आपला शेवटचा टी-20 सामना 2018 च्या अखेरीस खेळला होता.
गेल्या एप्रिलमध्ये पाक संघाने न्यूझीलंड विरुद्ध टी-20 मालिका खेळली होती. या मालिकेसाठी अष्टपैलू आश्रफ आणि मोहम्मद हॅरिस यांना वगळण्यात आले होते. पुढील वर्षी अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या दृष्टीकोनातून पाक संघाची पुनर्बांधणी प्रक्रिया सुरू आहे. या आगामी मालिकेसाठी पाक संघामध्ये नवोदित सईम आयुब, हसिबुल्ला, झमान खान, आझम खान, अमीर जमाल आणि अब्बास आफ्रिदी यांना संधी देण्यात आली आहे.
शदाबला मालिका हुकणार?
पाक क्रिकेट संघातील अनुभवी अष्टपैलू शदाब खानला 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला मुकावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शदाब खानला यापूर्वी घोट्याला दुखापत झाली असून ती अद्याप पुर्णपणे बरी झालेली नाही. दरम्यान तो या दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघाबरोबर प्रयाण करणार असल्याचे पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले.
पाक टी-20 संघ : शाहिन आफ्रिदी (कर्णधार), अमीर जमाल, अब्बास आफ्रिदी, अब्रार अहमद, आझम खान, बाबर आझम, फक्र झमान, हॅरिस रौफ, हसिबुल्ला, इफ्तिकार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासिम ज्युनिअर, एस. फरहान, सईम आयुब, उस्मा मीर आणि झमान खान.









