वृत्तसंस्था / लाहोर
यजमान पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला येथे रविवारपासून प्रारंभ होत आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत ही मालिका होत आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाला नियमीत कर्णधार बवूमा आणि फिरकी गोलंदाज केशव महाराज यांची उणिव चांगलीच भासेल. या मालिकेसाठी द.आफ्रिकेचे कर्णधारपद अॅडम मारक्रेमकडे सोपविण्यात आले आहे.
या मालिकेसाठी पाकने फिरकी गोलंदाजीला अनकुल ठरणाऱ्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. त्यामुळे पाकच्या फिरकी गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजीची सत्त्वपरीक्षा ठरेल. या मालिकेसाठी द.आफ्रिका संघात नवोदित फलंदाज ब्रेव्हीस याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहील. द.आफ्रिकेचा संघ तब्बल चार वर्षांनंतर पाकमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. 2021 साली पाकमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत द.आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला होता.
एक वर्षांपूर्वी पाक संघाने आपल्या हुकमी फिरकी गोलंदाजांच्या जोडीवर इंग्लंडचा कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. दुखापतीमुळे या मालिकेत नियमीत कर्णधार बवूमा उपलब्ध होऊ न शकल्याने आता मारक्रेमवर संघाची अधिक जबाबदारी राहील. या मालिकेसाठी द.आफ्रिकेने फिरकीचा चांगलाच सराव यापूर्वी केला आहे, असे कर्णधार मारक्रेमने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. द.आफ्रिकेचा संघ अलिकडच्या कालावधीत क्रिकेटच्या विविध प्रकारात दर्जेदार कामगिरी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचे जेतेपद मिळविताना द.आफ्रिकेने बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. केशव महाराज स्नायु दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. पण रावळपिंडीच्या दुसऱ्या कसोटीत तो उपलब्ध राहील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.









