बलुचिस्तानमधील स्फोटात 11 ठार, 6 जण गंभीर : ट्रक बॉम्बने उडवला
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद, क्वेटा
पाकिस्तानमध्ये शुक्रवारी झालेल्या एका बॉम्बस्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तथापि, अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हा स्फोट नैर्त्रुत्य पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये झाला. कोळसा खाण कामगारांना एका ट्रकमधून नेले जात असताना त्यांचे वाहन बॉम्बस्फोटाने उडवत हल्ला करण्यात आला. पाकिस्तानात पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
कोळसा खाण कामगारांनी भरलेल्या ट्रकला रिमोट कंट्रोल डिव्हाईसद्वारे लक्ष्य करण्यात आले. बॉम्बस्फोटावेळी ट्रकमध्ये 17 खाण कामगार होते. जखमींपैकी दोघांची प्रकृती अतिगंभीर असल्याचे स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. कामगारांना बलुचिस्तान प्रांतातील हरनाई भागात असलेल्या एका खाणीत ट्रकने नेले जात होते. या हल्ल्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ सुरक्षा अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. स्फोटस्थळाचा ताबा घेतल्यानंतर पुरावे गोळा केले जात आहेत. प्राथमिक तपासानुसार, स्फोटके रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आली होती. स्फोटात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेले कामगार शांगला येथील पुराण गावातील रहिवासी आहेत.
पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाशी झुंजत आहे. गेल्या काही वर्षांत बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे क्षेत्र खनिजांनी समृद्ध आहे. पण बलुच लोक चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या प्रभावाला विरोध करत आहेत. चीन आणि पाकिस्तानने आपल्या संसाधनांवर कब्जा करणे बेकायदेशीर वाटत असल्याने बलुचिस्तानमध्ये चिनी प्रकल्प आणि नागरिकांना लक्ष्य केले जाते.
दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई : मुख्यमंत्री
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या बॉम्बस्फोटाच्या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी कामगारांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करतानाच जखमी कामगारांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश दिले. निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणारे दहशतवादी कोणत्याही प्रकारच्या माफीस पात्र नाहीत. बलुचिस्तानच्या शांततेला हानी पोहोचवणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे बुगती यांनी म्हटले आहे.









