शिष्टमंडळाच्या दौऱयामुळे पाकिस्तानात वाद
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
इस्रायलला देश म्हणून मान्यता न देणारा पाकिस्तान आता पडद्याआडून मैत्रीचा पुढाकार घेत असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानी-अमेरिकनांच्या एका शिष्टमंडळाने अलिकडेच भेट घेतल्याची माहिती इस्रायलचे राष्ट्रपती इसहाक हर्जोग यांनी दिली आहे. इस्रायलच्या राष्ट्रपतींच्या या खुलाशानंतर पाकिस्तानात वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष असलेल्या इम्रान खान यांच्या पीटीआयने शाहबाज शरीफ सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. पीटीआयच्या नेत्यांनी शाहबाज शरीफ सरकारला ज्यू एजंटच ठरविले आहे. तर पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने या पूर्ण प्रकरणी स्वतःचे अंग झटकले आहे.
अब्राहम कराराने मुस्लीम जगताला इस्रायलच्या जवळ आणले आणि आता उर्वरित देशांचे इस्रायलसंबंधीचे विचारही आता बदलत आहेत. यातून ज्यू आणि मुस्लीम या क्षेत्रात एकत्र राहू शकतात असे सिद्ध होते असे हर्जोग यांनी म्हटले आहे. अब्राहम करारामुळेच संयुक्त अरब अमिरात आणि बहारीनसोबत इस्रायलचे राजनयिक संबंध प्रस्थापित झाले होते.
इस्रायलच्या राष्ट्रपतींची दोन शिष्टमंडळांनी भेट घेतली आहेत. यातील पहिले शिष्टमंडळ मोरक्को या मुस्लीम देशातील तरुण नेत्यांचे होते. या नेत्याहंनी इस्रायलच्या ग्रूपसोबत हातमिळविणी केली आहे. हर्जोग यांना भेटलेले दुसरे शिष्टमंडळ पाकिस्तानी-अमेरिकनांचे होते.
पाकिस्तानी शिष्टमंडळाने इस्रायलचा दौरा केल्याचे वृत्त समोर येताच पाकिस्तानात गदारोळ झाला आहे. विरोधी पक्षांनी शाहबाज शरीफ सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या मदतीने शाहबाज शरीफ सरकार सत्तेवर आल्याच आरोप या दौऱयामुळे खरा ठरत असल्याची टीका इम्रान खान यांच्या पक्षाने केली आहे.
पाकिस्तान इस्रायलला मान्यता देत नसल्याने त्याचे या ज्यू राष्ट्रासोबत राजनयिक संबंध नाहीत. पाकिस्तानने पॅलेस्टिनींसाठी स्वतंत्र देशाच्या मागणीला समर्थन दिलेले आहे.









