वृत्तसंस्था / कराची
ऑगस्टमध्ये भारतात होणाऱ्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी पाकचा संघ पाठविण्यास पाक हॉकी फेडरेशनने नकार दिला आहे. सुरक्षेच्या कारणावरुन पाक हॉकी संघ भारतात पाठविण्यास आपली तयारी नसल्याचे पाक हॉकी फेडरेशनने आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनला कळविले आहे.
या सार्धेत पाकचा हॉकी संघ पाठविण्यास आपली तयारी नसल्याचे पाक हॉकी फेडरेशनचे प्रमुख तारीक बुगटी यांनी स्पष्ट केले. या संदर्भात आपण आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन त्याचप्रमाणे आशियाई हॉकी फेडरेशनला लेखी स्वरुपात कळविले आहे. भारतात होणारी ही आशिया चषक हॉकी स्पर्धा आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी थेड पात्रतेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. भारतातील सुरक्षेच्या कारणामुळे पाकचे हॉकीपटू येण्यास नाखुष असल्याचे त्याने म्हटले आहे. दरम्यान या आगामी स्पर्धेसाठी पाक हॉकी संघ भारतात येणार नसल्याचे एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.









