भारतीयांकडून तीव्र संताप व्यक्त
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अशास्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला वर्तमान एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी अंतर्गत सुमारे 1 अब्ज डॉलर्सचा हप्ता जारी करण्यास मंजुरी दिली आहे. भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणाऱ्या पाकिस्तानला आर्थिक मदत केल्याप्रकरणी आता आयएमएफ जागतिक संतापाला सामोरे जात आहे.
आयएमएफने पाकिस्तानला शुक्रवारच्या बैठकीत 1 अब्ज डॉलर्सचा निधी जारी करण्यास मंजुरी दिली. यानंतर आता पाकिस्तानला एकूण 2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे. प्रत्यक्षात आयएमएफने वर्तमान 7 अब्ज डॉलर्सच्या बेलआउट पॅकेज अंतर्गत पाकिस्तानसाठी क्लायमेट रेसिलियन्स लोनसाठी देखील अतिरिक्त 1.4 अब्ज डॉलर्सची रक्कमही मंजूर केली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने आयएमएफकडून निधी मंजूर होणे म्हणजे भारताच्या दबावाची रणनीति अपयशी ठरणे असल्याचा दावा केला आहे.
मतदानापासून भारताने राखले अंतर
आयएमएफच्या व्यासपीठावर पाकिस्तानला थेट आर्थिक मदत देण्याच्या विरोधात भारताने स्वत:चा आक्षेप अत्यंत विचारपूर्वक नोंदविला आहे. आयएमएफच्या बैठकीत पाकिस्तानला कर्जाचा आणखी एक हप्ता देण्याच्या निर्णयावर चर्चा झाली असता भारताने ‘अब्सटेन’ म्हणजेच मतदानापासून अंतर राखण्याचा निर्णय घेतला. आयएमएफच्या कार्यकारी मंडळात 25 संचालक असतात, जे जगभरातील देशांचे प्रतिनिधित्व करतात. आयएमएफमध्ये निर्णय ‘संमती’ने घेतले जातात, परंतु मतदानाची वेळ आल्यास कुठलाही देश विरोधात मतदान करू शकत नाही, यात केवळ समर्थन किंवा मतदान न करण्याची अनुमती असते. अशास्थितीत भारताने स्वत:चा विरोध दर्शविण्यसाठी मतदानापासून अंतर राखण्याचा पर्याय निवडला आहे.
भारताने केली पोलखोल
पाकिस्तानने वारंवार आयएमएफकडून कर्ज घेण्याच्या प्रकाराबद्दल सवाल भारताने उपस्थित केला. पाकिस्तानने मागील 35 वर्षांमध्ये 28 वेळा आयएमएफकडून कर्ज घेतले असून यातील केवळ मागील 5 वर्षांमध्येच 4 वेळा कर्ज घेण्यात आले, परंतु पाकिस्तानात कुठलीच आर्थिक सुधारणा दिसून येत नसल्याची भूमिका भारताने बैठकीत मांडली. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत तेथील सैन्याचा हस्तक्षेप अत्यंत अधिक आहे. यामुळे पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधित्वाचे नियंत्रण पूर्णपणे गायब होते. आयएमएफसारगया संस्थांचा पैसा सैन्याचा हस्तक्षेप असलेल्या व्यवस्थेकडे जातो, तेव्हा सुधारणांची अपेक्षा फोल ठरत असल्याचे भारताने सुनावले आहे.
आयएमएफचा निर्णय चुकीचा
भारतीय उपखंडात तणाव कमी करण्याऐवजी आयएमएफ पाकिस्तानला शस्त्रास्त्रांसाठी आर्थिक मदत करत आहे. पाकिस्तान या रकमेचा वापर पुंछ, राजौरी, उरी, तंगधार समवेत अन्य ठिकाणी हल्ले करण्यासाठी करणार असल्याची टीका जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.









