आठ गडी राखून दणदणीत विजय : रेहमतउल्लाह, इब्राहिम झद्रन, रेहमत शाहची शानदार अर्धशतके
वृत्तसंस्था/ चेन्नई
चेन्नई येथे झालेल्या लढतीत रेहमानउल्लाह गुरबाज, सामनावीर इब्राहिम झद्रन व रेहमत शाह यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्ताने पाकिस्तानचा 8 गड्यांनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, अफगाण संघाचा हा वर्ल्डकपमधील दुसरा धक्कादायक विजय आहे. याआधी त्यांनी गतविजेत्या इंग्लंडला धक्का दिला होता यानंतर सोमवारी झालेल्या लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकला नमवण्याची किमया साधली. प्रारंभी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 282 धावा केल्या. यानंतर अफगाणिस्ताने विजयी आव्हान 49 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. अफगाणचा हा पाकवरील पहिला वनडे विजय आहे.

पाकिस्तानवरील विजयासह अफगाण संघाला दोन गुण मिळाले असून गुणतालिकेत ते चार गुणासह सहाव्या स्थानी पोहोचले आहेत. पाकिस्तानला या पराभवाचा मात्र चांगलाच फटका बसला आहे. हा त्यांचा पाच सामन्यातील तिसरा पराभव आहे.
पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 283 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाण संघाची दमदार सुरुवात झाली. सलामीवीर रेहमानउल्लाह गुरबाज व इब्राहिम झद्रन यांनी 21.1 षटकांत 130 धावांची सलामी दिली. गुरबाजने 53 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह 65 धावांची शानदार खेळी साकारली. 65 धावांवर त्याला शाहिन आफ्रिदीने बाद केले. यानंतर इब्राहिम झद्रन व रेहमत शाह यांनी एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असतानाच झद्रनला हसन अलीने बाद केले. झद्रनने 113 चेंडूत 10 चौकारासह 87 धावा फटकावल्या. शतक पूर्ण करण्यात मात्र तो अपयशी ठरला. झद्रन बाद झाल्यानंतर मात्र रेहमत शाह व कर्णधार हशमतउल्लाह शाहिदी यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 96 धावांची भागीदारी साकारत संघाला विजय मिळवून दिला. रेहमत शाहने 84 चेंडूत नाबाद 77 तर हशमतउल्लाहने 45 चेंडूत नाबाद 48 धावांचे योगदान दिले. या जोडीने 49 व्या षटकांत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. पाककडून शाहिन आफ्रिदी व हसन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
बाबर आझमचे अर्धशतक

प्रारंभी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर अब्दुल्ला शफीक व इमाम उल हक यांनी अर्धशतकी सलामी दिली. पण, अवघ्या 17 धावांवर इमामला उमरझाईने बाद केले. यानंतर शफीक व कर्णधार बाबर आझम यांनी एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाचे शतक फलकावर लावले. शफीकने अर्धशतकी खेळी साकारताना 75 चेंडूत 58 धावा फटकावल्या. शफीक बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवानही फार काळ टिकला नाही. त्याला 8 धावांवर नूर अहमदने तंबूचा रस्ता दाखवला. कर्णधार बाबरने मात्र दुसऱ्या बाजूने किल्ला लढवताना 74 धावांची संयमी खेळी साकारली. 92 चेंडूत त्याने 4 चौकार व 1 षटकार लगावला. बाबरची शानदार खेळी नूर अहमदने संपुष्टात आणली, 74 धावांवर त्याला बाद केले. बाबर बाद झाल्यानंतर पाकची 41 व्या षटकांत 5 बाद 206 अशी स्थिती झाली होती. यानंतर अखेरच्या काही षटकांत शादाब खान 38 चेंडूत 40 व इफ्तिकार अहमद 27 चेंडूत 40 धावा करत संघाला 50 षटकांत 7 बाद 282 धावापर्यंत मजल मारुन दिली. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 73 धावांची भागीदारी साकारल्याने पाकला पावणेतीनशेचा टप्पा गाठता आला.
दरम्यान, विश्वचषकातील आपला हा पहिलाच सामना खेळत असलेल्या नूर अहमदने अफगाणिस्तानसाठी सर्वोत्तम गोलंदाजी करत तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने आपल्या दहा षटकांमध्ये 49 धावा देत तिघांना बाद केले. याशिवाय नवीन उल हकने दोन गडी बाद केले. मोहम्मद नबी आणि अझमतुल्लाह उमरझाई यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान 50 षटकांत 7 बाद 282 (अब्दुल्ला शफीक 58, बाबर आझम 74, शादाब खान 40, इफ्तिकार अहमद 40, नूर अहमद 49 धावांत 3 बळी, नवीन उल हक दोन बळी) .
अफगाणिस्ता 49 षटकांत 2 बाद 286 (रेहमानउल्लाह गुरबाज 65, इब्राहिम झद्रन 87, रेहमत शाह नाबाद 77, हशमतउल्लाह शाहिदी नाबाद 48, शाहिन आफ्रिदी व हसन अली प्रत्येकी एक बळी).
पाकिस्तानविरुद्ध पहिलाच विजय
अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध वनडेत पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 8 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने पहिले 7 सामने जिंकले आहेत. एकदिवसीय विश्वचषकातील अफगाणिस्तानचा हा तिसरा विजय आहे. त्याआधी त्यांनी 2015 मध्ये स्कॉटलंडला आणि आता या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला पराभूत केले आहे. अफगाण संघाने 2015 पासून विश्वचषक खेळण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून अफगाणिस्तानने विश्वचषकात एकूण 20 सामने खेळले आहेत, त्यापैकी 3 जिंकले आहेत.









