स्वातंत्र्यसैनिक असल्याची परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची दर्पोक्ती
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पेहलगाम येथे निर्दोष भारतीय पर्यटकांवर निर्घृण हल्ला करुन 28 पर्यटकांचे बळी घेणारे दहशतवादी हे ‘स्वातंत्र्य सैनिक’ आहेत, अशा शब्दांमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक दर यांनी त्यांचे कौतुक केले आहे. अशा प्रकारे त्यांनी भारताच्या जखमेवर मीठ चोळले असून त्यामुळे भारताच्या संतापात भर पडली आहे. दर यांची सोशल मिडियावरही मोठ्या प्रमाणात निंदा केली जात आहे.
भारताने पाकिस्तानशी झालेला सिंधू जलवितरण करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानच्या मनात भीती उत्पन्न झाल्याचे दिसून येत आहे. भारताने या देशाच्या विरोधात इतरही अनेक कठोर उपाय योजना करण्याची घोषणा केली असून हा केवळ प्रारंभ आहे, असेही स्पष्ट केले आहे. पाकिस्तानला मोठा धडा दिला पाहिजे, अशी सर्वसामान्य भारतीयांचीही भावना असून सरकारला तिचे महत्व ओळखावे लागेल, असे एकंदर वातावरण आहे. त्यामुळे सरकार काहीना काही मोठा निर्णय लवकरात लवकर घेण्याची शक्यता असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे.
ही तर युद्धकृती
भारताने पाकिस्तानशी झालेला सिंधू करार स्थगित करणे म्हणजे पाकिस्तानशी युद्धाची घोषणा केल्यासारखे आहे, अशीही प्रतिक्रिया दर यांनी व्यक्त केली. पाकिस्तानच्या 24 कोटी लोकांना पाण्याची आवश्यकता आहे. भारत आमचे पाणी रोखू शकत नाही. आमचे पाणी आडविण्याचा प्रयत्न भारताने केला तर तो सहन केला जाणार नाही. भारताने पाकिस्तावर हल्ला केल्यास आम्ही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत, असाही दावा दर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
प्रशासनाचीही अशीच दर्पोक्ती
पाकिस्तानी प्रशासनानेही अशीच दर्पोक्ती केली आहे. भारताने सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचे पाणी आडविण्याचा किंवा वळविण्याचा प्रयत्न केल्यास ती युद्धाची घोषणा म्हणून गणली जाईल. मग पाकिस्तानही अशाच प्रकारे कृती करेल, असे प्रतिपादन पाकिस्ताचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद असीफ यांनी केले आहे.
पाकिस्तानची वाढली चिंता
पेहलगाम हल्ला पाकिस्तानला महागात पडू शकतो. या हल्ल्यामुळे आणि त्यातील निर्घृणतेमुळे विश्वसमुदायाचे मत पाकिस्तानच्या विरोधात गेले आहे. या हल्ल्याची निंदा जगातील सर्व महत्वाच्या देशांनी केली असून भारताला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आधीच आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेला पाकिस्तान जगात एकटा पडू शकतो, अशी चिंता त्याला सतावत आहे. पाकिस्तानने प्रथम या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नाही, असा कांगावा करत हात झटकण्याचा प्रयत्न केला. तथापि, नंतर या हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाल्यानंतर त्याने उसने अवसान आणून भारताला धमकाविण्याचा प्रयत्न चालविला आहे.









