अझरबैजानमध्ये व्यक्त केली इच्छा
वृत्तसंस्था/लाचिन
भारतासोबत चर्चा करण्यास मी तयार आहे. दोन्ही देशांनी मिळून काश्मीर, पाणी आणि दहशतवाद यासारख्या मुद्द्यांवर तोडगा काढायला हवा, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अझरबैजानच्या लाचिन येथे बोलताना केले आहे. ते पाकिस्तान-तुर्किये-अझरबैजान त्रिपक्षीय परिषदेत बोलत होते. यापूर्वी सोमवारी इराण दौऱ्यादरम्यान त्यांनी भारतासोबत चर्चा करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. शांततेसाठी एकत्र येऊन दोन्ही देशांनी चर्चा करावी. काही मुद्द्यांवर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे आणि ते चर्चेद्वारे निकाली काढावे लागतील. काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार तोडगा काढला जावा, असे त्यांनी म्हटले आहे. तर भारताने पाकिस्तानसोबत केवळ पीओके आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
सिंधू जल कराराचा उल्लेख
भारत दहशतवाद विरोधात प्रामाणिक चर्चा करू इच्छित असेल तर पाकिस्तान देखील यासाठी तयार आहे, असे म्हणत शरीफ यांनी भारतासोबत पुन्हा व्यापार सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वात मोठा शिकार देश आहे. पाकिस्तानात मागील काही दशकांमध्ये दहशतवादामुळे 90 हजार लोकांनी जीव गमावला आहे तर 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असल्याचे शरीफ म्हणाले. भारताने सिंधू जल कराराचा अस्त्राप्रमाणे वापर करण्याचे धोरण अवलंबिले आहे. सिंधू नदी पाकिस्तानच्या 24 कोटी लोकांसाठी जीवनरेषा आहे. हा करार लोकांसाठी शेती, पेयजल आणि अन्य गरजांसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे.
तुर्किये, अझरबैजान मित्रदेश
सद्यस्थितीत पाकिस्तान सुदैवी आहे, कारण त्याच्याकडे तुर्किये आणि अझरबैजानसारखे विश्वसनीय मित्र आहेत, असेही शरीफ यांनी नमूद केले आहे. अलिकडेच झालेल्या संघर्षात या दोन्ही देशांनी पाकिस्तानला साथ दिली होती.
एर्दोगान यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव
तुर्कियेचे अध्यक्ष एर्दोगान यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारत-पाक युद्धविराम स्थायी शांततेत बदलेल, अशी अपेक्षा आहे. तुर्किये याकरता शक्य ते सर्व योगदान देण्यास तयार आहे. संघर्षाच्या घटना पाहता आमच्या देशांदरम्यान एकजुटता किती आवश्यक आहे हे कळते. पाकिस्तान आणि भारतादरम्यान वाढलेला तणाव समाप्त करणारा युद्धविराम झाल्याचा आम्हाला आनंद असल्याचे एर्दोगान यांनी म्हटले आहे.









