सीपीईसीवरून दोन्ही देशांमध्ये चर्चा ः कराची-पेशावर रेल्वेमार्ग प्रकल्प लवकरच
वृत्तसंस्था/ बीजिंग
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे 2 दिवसीय दौऱयानिमित्त चीनमध्ये पोहोचले आहेत. या दौऱयात त्यांनी सीपीईसी जॉइंट को-ऑपरेशन कमिटीच्या दस्तऐवजांवर स्वाक्षरी केली आहे. याच्या अंतर्गत दोन्ही देशांनी कराची ते पेशावरदरम्यान रेल्वेमार्गाच्या 10 अब्ज डॉलर्सच्या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्षी जिनपिंग हे चीनचे अध्यक्ष म्हणून तिसऱयांदा निवडले गेल्यावर कुठल्याही राष्ट्रप्रमुखाचा हा पहिलाच दौरा आहे. भारतासोबत दोन्ही देशांचे तणावाचे संबंध असल्याने या दौऱयात होणाऱया घडामोडींकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे.
चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 2013 मध्ये या प्रकल्पास सुरुवात झाली होती. यात पाकिस्तानच्या ग्वादारपासून चीनच्या काशगरपर्यंत 50 अब्ज डॉलर्सच्या (सुमारे 3 लाख कोटी रुपये) खर्चातून आर्थिक पट्टा तयार केला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीन अरबी समुद्राशी जोडला जाणार आहे. सीपीईसी अंतर्गत चीन रस्ते, बंदर, रेल्वे आणि ऊर्जा प्रकल्पांवर काम करत आहे.
पाकिस्तानातील यापूर्वीच्या इम्रान खान सरकारने चालू वर्षाच्या प्रारंभी सीपीईसी रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तर ग्वादारमध्येही सीपीईसीला विरोध होत असल्याने या प्रकल्पाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. या स्थितीमुळे चीन अत्यंत नाराज आहे. शाहबाज सरकार आता सीपीईसीचे काम पुन्हा सुरू करून चीनची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
जिनपिंग आणि शरीफ या दोघांनी सीपीईसी आणि सामरिक भागीदारी समवेत विविध क्षेत्रांमध्ये बहुपक्षीय सहकार्य मजबूत करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. तर शरीफ आणि जिनपिंग यांनी दोन्ही देशांदरम्यान ऑल वेदर स्ट्रटेजिक को-ऑपरेशन पार्टनरशिपला बळ देण्याची इच्छा व्यक्त केल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले.









