वृत्तसंस्था/काबूल
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीचा भंग पाकिस्तानकडून करण्यात आला असून पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणिस्तानातील काही निवासी भागांवर गोळीबार केला आहे. अफगाणिस्तानच्या आतल्या भागातील काही स्थानांवर पाकिस्तानच्या सैनिकांनी ड्रोन्स आणि तोफगोळ्यांचा मारा केल्याची माहिती अफगाणिस्तान प्रशासनाने दिली आहे. या हल्ल्यात काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, आमची फारशी हानी झाली नाही, असे त्या देशाने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचा भंग होत आहे, अशी तक्रार अफगाणिस्तानकडून करण्यात येत आहे.
दोन्ही देश एकाबाजूला एकमेकांवर हल्ले करत असताना, दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चाही होत आहे. मात्र, अद्याप या चर्चेत फारशी प्रगती झालेली नाही. पाकिस्तानच्या अटी अफगाणिस्तानला मान्य नाही. अफगाणिस्तानने आपल्या सर्व स्थलांतरितांना परत घ्यावे, अशी पाकिस्तानची मागणी आहे. तर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या विरोधात असणाऱ्या कोणत्याही कारवाया आपल्या भूमीवरुन करु नयेत, अशी अट अफगाणिस्तानने ठेवली आहे. या अटी दोन्ही देशांनी धुडकाविल्या आहेत. त्यामुळे पुढची चर्चा संशयास्पद झाली आहे. दोन्ही देशांना अन्य काही देशही चर्चेत साहाय्य करीत आहेत.
या महिन्याच्या प्रारंभापासूनच दोन्ही देशांमध्ये सीमेवरील संघर्ष होत आहे. या दोन्ही देशांमध्ये जवळपास 2 हजार 600 किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे. ती ड्यूरांड रेषा म्हणून ओळखली जाते. मात्र, अफगाणिस्तानला ही रेषाच मान्य नाही. ही रेषा अफगाणिस्तानची सहमती न घेताच निर्धारित करण्यात आली. अफगाणिस्तानचा मोठा भाग यामुळे पाकिस्तानात गेला आहे. तो परत मिळाला पाहिजे, असे अफगाणिस्तानचे म्हणणे आहे. या दोन्ही देशांमध्ये याच मुद्द्यावरुन नेहमी खटके उडत असतात.
गेल्या दोन महिन्यांमध्ये या मतभेदांनी उग्र संघर्षाचे रुप घेतले असून सीमेवरील संघर्षात या कालावधीत 50 पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले आहे. तर पाकिस्तानकडून अफगाणिस्तानचे काही सैनिक आणि सर्वसामान्य नागरीक मारले गेले आहेत. अफगाणिस्तानने पाकिस्तानात वाहून जाणारे आपल्या नद्यांचे पाणीही अडविण्याचा इशारा दिला आहे. या देशाने खरोखरच असे पाणी अडविल्यास पाकिस्तानात पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. अशा कारणांमुळे दोन्ही देशांमधील संघर्षाला अधिकच बळ मिळाले आहे.









