दिवसअखेरीस 7 बाद 68 : हॅजलवूडचे 9 धावांत 4 बळी
वृत्तसंस्था/ सिडनी
येथे ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानची स्थिती नाजूक झाली आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात 14 धावांची आघाडी मिळवूनही काहीच फायदा झालेला नाही. कारण दुस्रया डावात अवघ्या 68 धावांवर 7 गडी तंबूत परतले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानकडे 82 धावांची आघाडी असून त्यांचे तीन गडी खेळायचे बाकी आहेत. दिवसअखेरीस मोहम्मद रिझवान 6 धावांवर खेळत होता. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात उर्वरित तीन खेळाडू तंबूत असतील अशी स्थिती आहे. त्यामुळे या मालिकेत पाकिस्तानला 3-0 ने व्हाईटवॉश मिळेल यात काही शंका नाही. तत्पूर्वी यजमान कांगारुंचा पहिला डाव 299 धावांवर संपुष्टात आला.
प्रारंभी, दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2 बाद 116 धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. अनुभवी लाबुशेनने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 6 चौकारासह 60 धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने 3 चौकारासह 38 धावांचे योगदान दिले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 81 धावांची भागीदारी केली. 38 धावांवर स्मिथला मीर हमजाने बाद करत ही जोडी फोडली. पाठोपाठ लाबुशेनलाही आगा सलमानने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर ट्रेव्हिस हेड (10) फारसा चमत्कार दाखवू शकला नाही. मिचेल मार्श व अॅलेक्स केरी यांनी सहाव्या गड्यासाठी 84 धावांची भागीदारी करत संघाला पावणेतीनशेपर्यंत मजल मारुन दिली. मार्शने अर्धशतकी खेळी साकारताना 113 चेंडूत 6 चौकारासह 54 धावा केल्या तर केरीने 38 धावा करत त्याला चांगली साथ दिली. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना मार्शला आमेर जमालने तंबूचा रस्ता दाखवला. केरीचा अडथळा साजीद खानने दूर केला. ही जोडी बाद झाल्यानंतर इतर तळाच्या ऑसी खेळाडूंनी मात्र हजेरी लावण्याचे काम केल्याने त्यांचा पहिला डाव 109.4 षटकांत 299 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार पॅट कमिन्सला भोपळाही फोडता आला नाही तर नॅथन लियान 5 धावा काढून बाद झाला. पाकिस्तानकडून आमेर जमालने शानदार गोलंदाजी करताना 69 धावांत 6 बळी घेतले. आगा सलमानने 2 तर मीर हमजा, साजीद खान यांनी प्रत्येकी एका गड्याला तंबूत पाठवले.
पाकिस्तानची घसरगुंडी
पाकिस्तानने पहिल्या डावात 313 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 299 धावांत आटोपल्यानंतर पाकला अवघ्या 14 धावांची आघाडी मिळाली. सिडनीच्या खेळपट्टीdयावर दुसऱ्या डावात खेळताना जोस हॅजलवूडच्या भेदक माऱ्यासमोर पाकच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातले. पहिल्याच षटकांत मिचेल स्टार्कने सलामीवीर अब्दुल्ला शफीकला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर पुढील षटकांत कर्णधार शान मसूदला हॅजलवूडने भोपळाही फोडू दिला नाही. सलामीला या धक्क्यातून पाकचा संघ सावरला नाही. बाबर आझम (23), सौद शकील (2), साजीद खान (0), आगा सलमान (0) हे स्वस्तात बाद झाले. पाककडून सईम आयुबने सर्वाधिक 33 धावा केल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 26 षटकांत 7 गडी गमावत 68 धावा केल्या होत्या. हॅजलवूडने सर्वाधिक 9 धावांत 4 गडी बाद केले. मिचेल स्टार्क, लियॉन व हेडने प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान पहिला डाव 313 व दुसरा डाव 26 षटकांत 7 बाद 68 (सईम आयुब 33, बाबर आझम 23, रिझवान खेळत आहे 6, हॅजलवूड 9 धावांत 4 बळी).
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 109.4 षटकांत सर्वबाद 299 (लाबुशेन 60, स्मिथ 38, मिचेल मार्श 54, केरी 38, आमेर जमाल 69 धावांत 6 बळी).









