वृत्तसंस्था / कराची
पाक वनडे संघाच्या कर्णधारपदी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची नियुक्ती पीसीबीने करुन अनपेक्षित धक्का दिला आहे. पाक वनडे संघाचा विद्यमान कर्णधार मोहम्मद रिझवानची अचानक हकालपट्टी करण्याचा निर्णय पीसीबीने घेतला आहे.
फैसलाबादमध्ये 4 ते 8 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या द.आफ्रिका विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी पीसीबीने पाक संघाच्या कर्णधारपदी शाहीन आफ्रिदीचे नाव घोषित केले. इस्लामाबादमध्ये अलिकडेच झालेल्या पीसीबीच्या निवड समिती सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक कारकिर्दीत 32 कसोटी, 66 वनडे आणि 92 टी-20 सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे. विंडीज विरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत मोहम्मद रिझवानकडे पाकचे नेतृत्व होते. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाक संघाने 20 पैकी 9 वनडे सामने जिंकले असून 11 सामने गमविले आहेत. तसेच अलिकडेच झालेल्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत तसेच त्यानंतरच्या न्यूझीलंड आणि विंडीजबराब्sारच्या मालिकेतील पराभवानंतर मोहम्मद रिझवानचे कर्णधारपद धोक्यात आले होते.









