केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांचे राजस्थानात पत्रकार परिषदेत प्रतिपादन
वृत्तसंस्था / दौसा
‘काश्मीरच्या मोठ्या प्रदेशावर पाकिस्तानने बेकायदेशीररित्या कब्जा केलेला आहे. हा प्रदेश भारताचा असून तो भारताला अपोआप मिळणार आहे. त्यामुळे त्यासंबंधी घाईगडबडीने काही करणे योग्य ठरणार नाही,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केले आहे. ते राजस्थानातील दौसा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळाल उलटसुलट चर्चा होत आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या पाकिस्तात प्रशासन आणि तेथील जनता यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. या भागात बहुसंख्येने असणारे शिया मुस्लीम भारताचे पक्षधर आहेत. त्यांनी पाकिस्तान प्रशासनाच्या अत्याचारांविरोधात मोठे आंदोलन छेडले असून भारत यात आपल्याला साहाय्य करेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
खिंड उघडण्याची मागणी
पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात येण्यासाठीचा मार्ग असलेली कारगिलच्या बाहेरच्या भागातील खिंड उघडून द्यावी अशी मागणी तेथील शिया मुस्लीमांनी केली आहे. भारतात पाकिस्तानपेक्षा शियांची स्थिती चांगली आहे. तेथे त्यांच्यावर अन्याय किंवा अत्याचार होत नाहीत. पाकिस्तानच्या प्रशासनाने शिया मुस्लीम समुदायाला संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप केला जात आहे.
भारत कब्जा करणार ?
याच पार्श्वभूमीवर भारत पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेणार का, अशी चर्चा होत आहे. या संदर्भात सिंग यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी, थोडा धीर धरा, हा भाग भारताला आपसूकच मिळणार आहे, असे विधान केल्याने,या वक्तव्याचा अर्थ लावण्यासाठी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
परिवर्तन संकल्प यात्रा
राजस्थानात येत्या डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्षाने तेथे पक्षप्रचारासाठी आणि राजस्थानच्या काँग्रेस सरकारविरोधात ‘परिवर्तन संकल्प यात्रे’ आयोजन केले आहे. याच यात्रेचा भाग म्हणून दौसा जिल्ह्यात व्ही. के. सिंग यांनी जाहीर सभेत भाषण करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली.
जी-20 चे यश अभूतपूर्व
यंदा जी-20 संघटनेचे नेतृत्व भारताकडे होते. भारताने ते अत्यंत यशस्वीरित्या सांभाळले, अशी प्रशंसा अमेरिका आणि इतर बलाढ्या देशांनीही केली. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश आहे. त्यांच्या कल्पक आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे आज भारताचे नाव जगात गाजत आहे, अशी भलावणही सिंग यांनी केली.
राजस्थान सरकार अकार्यक्षम !
राजस्थानातील काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. तसेच महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दलितांना मारले जात आहे. भाजपचे सरकार राज्यात आल्यास या गैरप्रकारांची चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असे प्रतिपादन व्ही. के. सिंग यांनी केले.
पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न नेमका काय
1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळत असताना काश्मीरचा समावेश भारतात झाला नव्हता. त्याचा लाभ उठवत पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी यांनी काश्मीरमध्ये घुसून त्याचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काश्मीरच्या तत्कालीन संस्थानिकांनी हा प्रदेश भारतात समाविष्ट केला. भारताने नंतर घुसखोरांवर सैनिकी कारवाई केली आणि काश्मीर खोऱ्यातून त्यांना बाहेर काढले. मात्र, भारतीय सैन्य जिंकत असताना आश्चर्यकारकरित्या त्याला युद्ध थांबविण्याचा आदेश नेहरु यांच्या सरकारने दिला. त्यामुळे काश्मीरच्या उत्तरेचा आणि पश्चिमेचा बराचसा भाग पाकिस्तानच्या ताब्यात राहिला. मात्र, कायदेशीररित्या संपूर्ण काश्मीर भारताचाच भाग असून तो भारताच्या नकाशातही 1947 पासून दाखविला जातो.
राजकीय चर्चेला प्रारंभ
ड पाकव्याप्त काश्मीर अपोआप मिळेल या विधानामुळे राजकीय चर्चा
ड पाकव्याप्त काश्मीर भारताचेच असल्याचे भारताचे नेहमी प्रतिपादन
ड आजही भारताच्या नकाशात लडाखसह संपूर्ण काश्मीरचा समावेश
ड पाकव्याप्त काश्मीरमधील बहुसंख्य शिया मुस्लीम भारताचे पक्षधर









