पेहलगाम हल्ल्याच्या ‘त्रयस्थ’चौकशीस संमती, मात्र भारताला इशारा देण्याची अद्यापही खुमखुमी
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पेहलगाम हल्ल्यासंबंधी भारताविरोधात कांगावा करणाऱ्या पाकिस्तानने आता नरमाईचा सूर आळवला आहे. पेहलगाम हल्ल्याची आम्ही निष्पक्ष, त्र्ययस्थ आणि पारदर्शी चौकशी करण्यास संमत आहोत, असे प्रतिपादन त्या देशाचे नेते शाहाबाझ शरीफ यांनी केले आहे. मात्र, भारताने दु:साहस केल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली आहे.
पेहलगाम हल्ल्यात आमचा हात नाही. आम्हाला जबाबदार धरुन बदनाम केले जात आहे. आम्ही या हल्ल्याच्या कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी राजी आहोत. तणाव कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. तथापि, आमचे सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असून आमच्यावर हल्ला झाल्यास चोख उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी केलेल्या या परस्परविरोधी प्रतिपादनामुळे पाकिस्तान प्रशासन किती गोंधळलेले आहे, याचे प्रत्यंतर येते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
शांती हवी आहे
आम्हाला शांती हवी आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही, की आम्ही कमजोर आहोत. सिंधू नदी आमच्या गळ्याची नस आहे. ती तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. भारत जगाची दिशाभूल करीत आहे. आमची अवमानना करीत आहे. आम्ही हे सहन करणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सारे पुरावे पाकिस्तानविरोधात
पेहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात आहे, ही बाब आता विश्वसमुदायानेही मान्य केली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव वाढला आहे. ज्या प्रकारे हा हल्ला करण्यात आला तशी कृती पाकिस्तानचे निर्ढावलेले दहशतवादीच करु शकतात. त्यामुळे पाकिस्तानने कितीही कांगावा केला, तरी त्याचे कृती लपून रहात नाही. परिणामी, जगात पाकिस्तानची छी थू होत असून त्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. आपल्यावरचा दबाव भारतावर ढकलण्याचा आता त्याचा प्रयत्न आहे.
बिलावल भुत्तो यांची धमकी
सिंधू नदीतून एकतर आमचे पाणी वाहील किंवा भारताचे रक्त वाहील, अशी धमकी पाकिस्तानचे एक सत्ताधारी नेते बिलावल भुत्तो यांनी दिली आहे. शनिवारी ते कराची येथे पत्रकारांशी बोलत होते. भारत आमचे पाणी बंद करु शकत नाही. तसे केल्यास सारा पाकिस्तान पेटून उठेल. भारताला हे जड जाईल, अशी धमकी भुत्तो यांनी दिली असली तरी तो केवळ कांगावा आहे. भारताने खरोखरच पाकिस्तानचे पाणी आडवले, तर पाकिस्तानवर अत्यंत मोठे आर्थिक संकट ओढवू शकते, अशी स्थिती असल्याचे मत अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.
पाकिस्तान युद्ध करु शकेल काय ?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या तणावाच्या संदर्भात एका महत्वाच्या प्रश्नावर दोन्ही देशांमध्ये चर्चा केली जात आहे. पाकिस्तान भारताशी युद्ध करण्याच्या स्थितीत आहे काय, हा प्रश्न महत्वाचा मानण्यात येत आहे. कारण तो देश सध्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. टंचाई, महागाई आणि बेरोजगारी तेथे अत्युच्च प्रमाणात आहे. त्यामुळे नेत्यांनी कितीही वाल्गना केल्या, तरी प्रत्यक्ष युद्धात या देशाचा कितपत टिकाव लागणार, याविषयी पाकिस्तानमध्येच अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.
भारत पाणी आडवू शकेल काय…
सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. प्रयत्न केल्यास भारत या निर्णयाला मूर्त स्वरुप देऊ शकतो. पाणी साठविण्याची पुरेशी व्यवस्था केल्यास भारत या पाकिस्तानच्या वाट्याला आलेल्या तीन्ही नद्यांचे पाणी आडवू शकतो, असे तज्ञांचे मत आहे. भारतानेही हे पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही मिळू न देण्याची त्रिस्तरीय योजना बनविली आहे. सध्या असलेल्या जलसाठा क्षमतेचा उपयोग भारताने करावयाचे ठरविले तर पाकिस्तानची त्वरित कोंडी करणेही भारताला शक्य आहे, असे अनेक जलतज्ञांचेही मत आहे.
ओमर अब्दुल्ला यांचा निर्णयाला पाठिंबा
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सिंधू जलकरार स्थगित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पूर्ण समर्थन व्यक्त केले आहे. आमचा पक्ष कधीही सिंधू जलकराराचा समर्थक नव्हता. 1960 मध्ये झालेल्या या करारामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांची मोठी हानी झाली आहे, अशी आमची भूमिका प्रारंभापासून आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले आहे. हा करार तत्कालीन नेते नेहरु यांच्या पुढाकाराने झाला होता. हा करार केल्याने भारताची प्रचंड हानी झाली आहे, अशी त्यावेळीही टीका झाली होती. पण हट्टाग्रहाने तो करण्यात आला होता.









