मदुश्का, डिसिल्वा यांची अर्धशतके, अब्रार, नोमनचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/ गॅले
येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तान संघ यजमान लंकेवर विजय मिळविण्याच्या मार्गावर असून अखेरच्या दिवशी त्यांना विजयासाठी 83 धावांची जरूरी आहे. 131 धावांचे माफक आव्हान मिळाल्यावर पाकने चौथ्या दिवशीअखेर दुसऱ्या डावात 15 षटकांत 3 बाद 48 धावा जमविल्या होत्या. इमाम उल हक 26 व बाबर आझम 6 धावांवर खेळत होते.
या कसोटीत लंकेने पहिल्या डावात 312 धावा जमविल्यानंतर पाकने सौद शकीलच्या द्विशतकाच्या जोरावर 461 धावा जमवित पहिल्या डावात लंकेवर 149 धावांची भक्कम आघाडी घेतली. नंतर लंकेने दुसऱ्या डावात 83.1 षटकांत सर्व बाद 279 धावा जमविल्याने पाकला विजयासाठी 131 धावांचे उद्दिष्ट मिळाले. लंकेच्या दुसऱ्या डावात निशान मदुश्काने 52 व धनंजय डिसिल्वाने 82 धावा जमवित अर्धशतके नोंदवली तर रमेश मेंडिसने 42, दिनेश चंडिमलने 28 धावा जमविल्या. पाकच्या अब्रार अहमद व नोमन अली यांनी प्रत्येकी 3 आगा सलमान व शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.

पाकच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. अब्दुल्ला शफीक 8 धावांवर बाद झाला तर शान मसूद 7 व नोमन अली शून्यावर बाद झाल्याने पाकची स्थिती 3 बाद 38 अशी झाली. इमाम उल हक व बाबर आझम यांनी आणखी पडझड होऊ न देता 15 षटकांत 3 बाद 48 धावांपर्यंत मजल मारून दिली. इमाम 4 चौकारांसह 25 धावांवर खेळत आहे तर आझम 6 धावा काढून त्याला साथ देत आहे. जयसूर्याने पाकचे दोन बळी टिपले तर अली धावचीत झाला.
संक्षिप्त धावफलक : लंका प.डाव 312, पाक प.डाव 461, लंका दु.डाव 83.1 षटकांत सर्व बाद 279 : मदुश्का 7 चौकार, 1 षटकारासह 52, धनंजय डिसिल्वा 10 चौकार, 2 षटकारांसह 82, रमेश मेंडिस 3 चौकार, 1 षटकारासह 42, चंडिमल 3 चौकारांसह 28, करुणारत्ने 20, कुसल मेंडिस 18, समरविक्रमा 11, जयसूर्या 10, अवांतर 4. गोलंदाजी : अब्रार अहमद 3-68, नोमन अली 3-75, शाहीन आफ्रिदी 2-64, आगा सलमान 2-39.
पाक दु.डाव 15 षटकांत 3 बाद 48 : शफीक 8, इमाम उल हक खेळत आहे 25, मसूद 7, नोमन अली 0, बाबर आझम खेळत आहे 6, अवांतर 2. गोलंदाजी : प्रभात जयसूर्या 2-17.









