वृत्तसंस्था/ शारजा
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत शुक्रवारी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणने पाकिस्तानचा 6 गड्यांनी पराभव करत 1-0 अशी आघाडी मिळविली. अफगाण संघातील मोहम्मद नबीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकने 20 षटकात 9 बाद 92 धावा जमविल्या. त्यानंतर अफगाणने 17.5 षटकात 4 बाद 98 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी तसेच 13 चेंडू बाकी ठेवून जिंकला.
पाकच्या डावामध्ये केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. सलामीच्या अयुबने 15 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17, तय्यब ताहीरने 9 चेंडूत 3 चौकारांसह 16, इमाद वासीमने 32 चेंडूत 18 तर कर्णधार शादाब खानने 18 चेंडूत 12 धावा जमविल्या. पाकच्या डावामध्ये 2 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे फारुखी, मुजीबूर रहमान आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 2 तर ओमरझाई, नवीन उल हक व रशिद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणच्या डावात सलामीच्या गुरुबाजने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16, इब्राहिम झेद्रानने 11 चेंडूत 1 चौकारासह 9, मोहम्मद नबीने 38 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 38, करीम झेनतने 7 तर नजीबुल झेद्रानने 23 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 17 धावा केल्या. नबी आणि झेद्रान यांनी पाचव्या गड्यासाठी अभेद्य 53 धावांची भागीदारी करून विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. अफगाणच्या डावात 2 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे एहसानउल्लाने 17 धावात 2 तर नसीम शहा व इमाद वासीम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
पाक 20 षटकात 9 बाद 92 (इमाद वासीम 18, ताहीर 16, शादाब खान 12, अयुब 17, फारुखी 2-13, मुजीबूर रहमान 2-9, मोहम्मद नबी 2-12, ओमरझाई, नवीन उल हक, रशिद खान प्रत्येकी 1 बळी), अफगाण 17.5 षटकात 4 बाद 98 (गुरबाज 16, इब्राहिम झेद्रान 9, नईब 0, मोहम्मद नबी नाबाद 38, करीम झेनत 7, नजीबुल झेद्रान नाबाद 17, अवांतर 11, नसीम शहा 1-27, इमाद वासीम 1-11, एहसानउल्ला 2-17).









