संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे चोख प्रत्युत्तर : पाक विदेश मंत्र्यांनी उपस्थित केला होता काश्मीर मुद्दा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीरचा राग आळवला आहे. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचे विदेशमंत्री इशाक डार यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांच्या टिप्पणीवर भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहणार असल्याचे म्हणत संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी पार्वथानेनी हरीश यांनी काश्मीरसंबंधी पाकिस्तानच्या दुष्प्रचारावर जोरदार टीका केली आहे.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि विदेशमंत्र्यांनी स्वत:च्या टिप्पणीत भारताचा अविभाज्य भाग जम्मू-काश्मीरचा उल्लेख केला आहे. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहणार असल्याचे पुन्हा स्पष्ट करू इच्छितो. पाकिस्तानचा खोटारडेपणा आणि दुष्प्रचार काश्मीरची वस्तुस्थिती बदलू शकत नाही. अलिकडेच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत मोठ्या संख्येत लोकांनी भाग घेतला. या मतदानाद्वारे लोकांनी स्वत:ची पसंत स्पष्ट केली. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या तुलनेत लोकशाही जिवंत अन् मजबूत आहे. तर पाकिस्तानने अनेक हिस्स्यांवर अवैध कब्जा केला असूनतेथील स्थिती अत्यंत खराब असल्याचे पार्वथानेनी यांनी सुनावले आहे.
भारत नेहमीच पाकिस्तानकडून पुरस्कृत दहशतवादाचा शिकार राहिला आहे. पाकिस्तानच्या भूमीतून संचालित जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा यासारख्या दहशतवादी संघटनांनी भारतात अनेक हल्ले घडवून आणले आहेत. पाकिस्तान हा दहशतवादाचे जागतिक केंद्र आहे. पाकिस्तानात 20 पेक्षा अधिक संयुक्त राष्ट्रसंघाकडून बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना अस्तित्वात आहेत. तरीही पाकिस्तान स्वत:ला दहशतवाद विरोधात लढणारा देश ठरवितो, ही तर सर्वात मोठी क्रूर चेष्टा असल्याचे पार्वथानेनी हरीश यांनी सुनावले आहे.
दहशतवाद कुठल्याही स्वरुपाचा, प्रकाराचा आणि उद्देशासाठी असला तरी त्याला योग्य ठरविले जाऊ शकत नाही, निर्दोष लोकांवरील हल्ल्याला कुठल्याहीप्रकारे योग्य ठरविता येणार नाही. पाकिस्तान खोटी माहिती फैलावण्याचा प्रयत्न करतो, परंतु सत्य यामुळे बदलणार नाही, असे हरीश यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानकडून आगळीक
पाकिस्तानच्या संसदेने मंगळवारी प्रस्ताव संमत करत काश्मीरमध्ये जनमत चाचणी करविण्याची मागणी भारताकडे केली आहे. पाकिस्तानातील काश्मीर विषयक मंत्री अमीर मुकाम यांनी काश्मिरी लोकांच्या ‘स्वयंनिर्णयाच्या अधिकारा’चा राग आळवत हा प्रस्ताव मांडला होता. तर भारताने ही मागणी यापूर्वीच फेटाळली आहे.
जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख
जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटनांनी भारतात अनेक हल्ले केले आहेत. पाकिस्तान या दहशतवादी संघटनांना बळ पुरवितो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 1267 अल-कायदा प्रतिबंध समितीच्या यादीत सामील अनेक दहशतवादी संघटना सक्रीय आहेत, या संघटनांची संपत्ती जप्त करणे, शस्त्रास्त्रांचा पुरवठा रोखणे आणि प्रवास निर्बंध लादण्याची तरतूद असल्याची आठवण भारताने पाकिस्तानला करून दिली.









