भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत अचूक नेम
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी रात्री संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतील (युएनजीए) भाषणावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानचे नाव न घेता आपला शेजारी दहशतवादाचा केंद्रबिंदू असल्याचा हल्लाबोल केला. दहशतवाद्यांना येथे उघडपणे गौरवले जाते. अनेक दशकांपासून, मोठ्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ल्यांची मुळे त्याच देशात आहेत, असा वर्मी घावही जयशंकर यांनी घातला.
जयशंकर यांनी दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाला दिला जाणारा निधी थांबवण्याचे आवाहन केले. संबंधित देशाने दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे. दहशतवाद्यांशी लढणे हे नेहमीच भारताचे प्राधान्य राहिले आहे. भविष्यातही आम्ही दहशतवादाविरोधातील लढा तीव्र करू, असेही जयशंकर यांनी ठणकावले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (युएनएससी) सुधारणा करण्याची मागणीही भारताने केली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यांची संख्या चौपट झाली आहे. आता, स्थायी सदस्यांची संख्या वाढवली पाहिजे असे सांगत यासंदर्भात भारत अधिक जबाबदाऱ्या घेण्यास तयार असल्याचेही स्पष्ट केले. जयशंकर यांनी आपल्या भाषणात ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरला.
पहलगाम हल्ला सीमापार दहशतवादाचे उदाहरण
जयशंकर यांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत सीमापार दहशतवादाचे सर्वात अलीकडील उदाहरण मांडले. भारताने आपल्या लोकांना दहशतवादापासून वाचवण्याचा आपला अधिकार वापरला आहे. स्वातंत्र्यापासून भारताला अशा शेजारी देशाचा सामना करावा लागला आहे जो दहशतवादाचे जागतिक केंद्र आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी यादीत पाकिस्तानी नागरिक असंख्य असल्याचे निदर्शनास आणून देताना जेव्हा एखादा देश दहशतवादाला सरकारी धोरण घोषित करतो, जेव्हा उद्योग पातळीवर दहशतवादी तळ कार्यरत असतात आणि जेव्हा दहशतवाद्यांना सार्वजनिकरित्या गौरवले जाते तेव्हा अशा हल्ल्यांचा बिनशर्त निषेध केला पाहिजे, असेही आमसभेत स्पष्टपणे सांगितले.
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील
दहशतवाद हा संपूर्ण जगाला भेडसावणारा एक सामान्य धोका असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. जे देश दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना वाचवतात त्यांना शेवटी त्यांच्यासारख्याच धोक्याचा सामना करावा लागेल, असा इशाराही जयशंकर यांनी दिला.
भारताच्या जागतिक योगदानावर प्रकाश
अलिकडच्या भूकंपाच्या काळात अफगाणिस्तान आणि म्यानमारच्या लोकांनी भारताचा पाठिंबा पाहिला. आम्ही उत्तर अरबी समुद्रात सुरक्षित व्यापार राखण्यास मदत केली आणि चाचेगिरी रोखण्यास मदत केल्याचे जयशंकर म्हणाले. आमचे सैनिक शांतता राखतात, आमचे सुरक्षा दल दहशतवादाविरुद्ध लढते, आमचे डॉक्टर आणि शिक्षक जगभरातील मानवी विकासात योगदान देतात, आमचे उद्योग परवडणारी उत्पादने तयार करतात, आमचे तांत्रिक तज्ञ डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देतात आणि आमची प्रशिक्षण केंद्रे जगासाठी खुली आहेत. हे सर्व आमच्या परराष्ट्र धोरणाच्या गाभ्यामध्ये असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.
भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाचे समर्थन
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाचे समर्थन केले. भारत आणि ब्राझीलला युएनएससीमध्ये कायमस्वरूपी स्थान मिळावे अशी इच्छा रशियाने व्यक्त केली आहे. त्यांनी शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) आणि ‘ब्रिक्स’सारख्या गटांचे महत्त्व देखील अधोरेखित केले. जगातील विकसनशील देशांच्या (ग्लोबल साउथ) हितासाठी एकत्र काम करण्यासाठी ब्रिक्स हे एक उत्कृष्ट माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले.









