जगभरातील पाक दूतावासांना आयएसआयचा आदेश : मुलांना भारतविरोधी कविता-भाषणे पुरवा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
पाकिस्तानात आर्थिक संकट असताना देखील तेथील सरकार आणि सैन्य सातत्याने स्वत:चा दुष्प्रचार फैलावण्यासाठी मोठी रक्कम खर्च करत आहे. हा दुष्प्रचार 27 ऑक्टोबर रोजी काश्मीरच्या इतिहासातील काळा दिन घोषित करण्यासाठी फैलावला जात आहे. ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय सैन्याने काश्मीरमधून पाकिस्तानी सैनिकांना हुसकावून लावले होते.
पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाच्या काही दस्तऐवजांनुसार 6 ऑक्टोबर रोजी तेथील सरकारने ‘काश्मीर ब्लॅक डे’शी निगडित कार्यक्रमांवर सुमारे 27 लाख रुपये खर्च केले होते. तर अन्य एका दस्तऐवजात विदेश सचिव मोहम्मद सायरस साजद काजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 27 ऑक्टोबर रोजी सकाळी इस्लामाबादच्या आगा शाही चौकात जमा होऊन रॅली काढण्याचा आदेश देण्यात आला होता.
27 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारी पाकिस्तानकडून कथित चर्चासत्र, बैठका आणि निदर्शनांचे आयोजन करण्याचे प्लॅनिंग करण्यात आले होते. युरोप, कॅनडामध्ये पाकिस्तान याद्वारे भारतविरोधी अजेंडा राबवू पाहत होता. परंतु पाकिस्तानला याप्रकरणी अपयश आल्याचे चित्र आहे. पाकिस्तानचे सैन्य आणि आयएसआय ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्ससोबत मिळून भारताबद्दल दुष्प्रचार करण्यासाठी काम करत आहे.
जेद्दा, बेल्जियम, जपान, मॉन्ट्रियल यासारख्या ठिकाणी पाकिस्तानी दूतावासांना भारतविरोधी कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या भारतविरोधी कार्यक्रमात मुलांना अधिक संख्येत सामील करण्यात यावे असा आदेशही पाकिस्तानी दूतावासांना देण्यात आला होता. तसेच मुलांकडून भारताच्या विरोधात लिहिण्यात आलेल्या कविता, भाषण सादर करण्यात यावे असेही आयएसआयने बजावले होते.
सोशल मीडियावरही दुष्प्रचार
पाकिस्तान भारतविरोधात सोशल मीडियाचा वापर करत आहे. आयएसआयकडून निर्माण करण्यात आलेल्या सोशल मीडिया अकौंट्सची नावे देखील आता उघड झाली आहेत. या सोशल मीडिया अकौंट्सद्वारे भारतविरोधात दुष्प्रचार केला जात आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्येही भारतविरोधात बातम्या प्रसारित करण्याची सक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानातील शालेय कर्मचाऱ्यांना मुलांसमवेत भारतविरोधी रॅलींमध्ये सहभागी होण्याचा आदेश देण्यात आला होता.
पाकिस्तानी रुपयाचे मूल्य खालावलेले
पाकिस्तानातील महागाईचा दर ऑगस्टमध्ये 27.4 टक्के होता, जो सप्टेंबरमध्ये वाढून 31.4 टक्के झाला आहे. तर देशातील व्याजदर वाढून 22 टक्क्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. पाकिस्तानी रुपया ऑगस्टमध्ये नीचांकी स्तरावर पोहोचला होता. तेथे एका डॉलरची किंमत 300 पाकिस्तानी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.









