ब्रिटनच्या हीथ्रो विमानतळावर पाकिट हस्तगत ः अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान विकल्याचा आरोप
@ वृत्तसंस्था / लंडन
अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायल समवेत जगातील सर्व मोठय़ा गुप्तचर यंत्रणा बुधवारी प्रकाशित एका वृत्तामुळे सतर्क झाल्या आहेत. ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने जगातील सर्वात मोठय़ा विमानतळांपैकी एक हीथ्रोवरून युरेनियमयुक्त एक पाकिट हस्तगत करण्यात आल्याचा खुलासा केला आहे. युरेनियमचे हे पाकिट पाकिस्तानातून अनेक देशांच्या मार्गे लंडनमध्ये पोहोचले आहे. ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा एमआय6 आणि स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अधिकृतपणे यासंबंधी काहीही सांगितलेले नाही. पाकिस्तानवर यापूर्वी देखील अण्वस्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान विकल्याचा आरोप झाला आहे.
युरेनियम हस्तगत होण्याची घटना 29 डिसेंबर रोजी घडली आहे. एक फ्लाइट ओमानमधून लंडनच्या हीथ्रो विमानतळावर पोहोचली होती. या फ्लाइटमध्ये मिळालेल्या पाकिटात युरेनियम होते. विमानतळावरील सुरक्षा दलाने हे पाकिट ताब्यात घेत स्कॉटलंड यार्ड तसेच गुप्तचर यंत्रणेला कळविले आहे. स्कॉटलंड यार्डनुसार दहशतवादविरोधी विभागाच्या एका विशेष पथकाला याप्रकरणी तपास सोपविण्यात आला आहे. उर्वरित तपास यंत्रणा या पथकाला मदत करणार आहेत. दैनंदिन तपासणीदरम्यान युरेनियमयुक्त हे पाकिट आढळून आले होते. हे पाकिट पाकिस्तानातून ओमानमध्ये पाठविण्यात आले होते, तेथून ते लंडनमध्ये आणले गेले होते. लंडनमध्ये हे पाकिट एका इराणी उद्योजकापर्यंत पोहोचविले जाणार होते. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता तपास यंत्रणांनी यासंबंधी अधिक माहिती देणे टाळले आहे.









