भारताच्या दणक्याने नष्ट झालेल्या तळांवर ताडपत्री
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘सिंदूर’ अभियानाच्या माध्यमातून भारताने दिलेल्या दणक्यामुळे पाकिस्तान चांगलाच हादरला असून आता त्याने आपली हानी लपविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. भारताच्या प्रतिहल्ल्यांमध्ये पूर्ण नष्ट झालेल्या तीन वायुतळांच्या ढिगाऱ्यांवर ताडपत्री पांघरुन ते जगाला दिसू नयेत अशी धडपड तो देश करीत आहे, असे नव्या उपग्रहीय छायाचित्रांवरुन स्पष्ट झाले आहे. भारतातील एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने बुधवारी ही छायाचित्रे प्रसिद्ध करून ही बाब स्पष्ट केली आहे.
भारताच्या अचूक माऱ्यामुळे पाकिस्तानातील 20 वायुतळ आणि लष्करी तळ नष्ट झाले होते. तसेच दहशतवाद्यांची 9 केंद्रेही उद्ध्वस्त झाली होती. विशेष हानी मुरीद, जाकोबाबाद आणि भोलारी येथील तळांची झाली होती. उपग्रहीय छायाचित्रांमधून या सर्व तळांवरची हानी स्पष्ट दिसत असल्याने तो जगात चर्चेचा विषय झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानची पाकिस्तानमध्येही नाचक्की होत आहे.
उद्ध्वस्त तळ परदानशीन
आपल्या उद्ध्वस्त तळांवर ताडपत्री टाकून आपल्या संरक्षण अकार्यक्षमतेची लाज झाकण्याचा उपक्रम त्या देशाने हाती घेतला आहे. उद्ध्वस्त तळांमध्ये पावसाचे पाणी शिरु नये म्हणून ताडपत्री टाकण्यात येत आहे, असे पाकिस्तानातील काही जणांचे म्हणणे आहे. तथापि, केवळ ताडपत्री टाकून अशाप्रकारे मोठ्या जागेचे पावसापासून संरक्षण करता येत नाही. त्यामुळे ही ताडपत्री अवकाशातून हे तळ दिसू नयेत म्हणूनच टाकली जात आहे, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले.
खासगी उपग्रहांकडूनही पोलखोल
आपली हानी झाकण्याचा प्रयत्न पाकिस्तान कसा करीत आहे, याचा पर्दाफाश पाकिस्तान कसा करीत आहे, हे मॅक्सर या एका खासगी उपग्रहाने सप्रमाण दाखवून दिले आहे. सिंधमधील भोलारी येथील तळावर ताडपत्री अंथरण्यात आली आहे. तसेच पंजाबमधील मुरीद येथील तळावर हिरव्या रंगाची ताडपत्री पसरण्यात आली आहे. मुरीद येथे भूगर्भात असणारा तळाचा भागही अशा प्रकारे तापडत्री टाकून बंद करण्यात आल्याचे हाय रिझोल्युशन छायाचित्रांमध्ये स्पष्ट दिसते.
एफ-16 विमानांचा तळ
जाकोबाबाद येथील शहबाझ हा वायुतळ पाकिस्तानच्या वायुदलाच्या आधारस्तंभ असणाऱ्या एफ-16 विमानांचा तळ होता. तो पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याचे 11 मेच्या उपग्रहीय छायाचित्रांमध्ये दिसून येत होते. तथापि, तेथील ढिगारे हलविण्यात आल्याचे आणि तळ स्वच्छ करण्यात येत असल्याचे 4 जूनच्या छायाचित्रांमध्ये दिसून येत आहे. अशी झाकपाक पाकिस्तानने 11 तळांवर केली असल्याचेही स्पष्ट होते. हा सर्व प्रकार आपल्या जनतेसमोर आपली झाकली मूठ सुरक्षित रहावी, यासाठी केला जात असल्याचे आता त्या देशातच उघडपणे बोलले जात आहे.









