युएनएससीत भारताचा हल्लाबोल : पाकिस्तानकडून काश्मीरचा मुद्दा उपस्थित
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
भारताने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद म्हणजेच युएनएससीत पुन्हा एकदा पाकिस्तानला सुनावले आहे. बुधवारी झालेल्या युएनएससीच्या बैठकीत पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. लडाख आणि जम्मू-काश्मीर हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहिला असून यापुढेही राहणार आहे. पाकिस्तानच्या भूमिकेचा या वस्तुस्थितीवर कुठलाच फरक पडत नसल्याचे युएनमधील भारताच्या मिशनचे उच्चायुक्त आशीष शर्मा यांनी म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये युएनएससीचे सदस्य चिल्ड्रन अँड आर्म्ड कॉन्फ्लिक्ट विषयक चर्चेत सामील झाले होते. यादरम्यान पाकिस्तानचे प्रतिनिधी मुनीर अकरम यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुतेरेस यांच्या नव्या अहवालात भारताचा उल्लेख नाही. ही एक चूक असल्याचे अकरम यांनी म्हटले होते.
अकरम यांच्या या टिप्पणीला भारतीय मुत्सद्दी शर्मा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. युएनएससीत एक शिष्टमंडळ आमच्या देशाविरोधात गरळ ओकत आहे. हा प्रकार राजकारणाने प्रेरित आहे. आम्ही हा प्रकार खपवून घेणार नाही. स्वत: कट्टरतेत बुडालेले लोक भारतीय समाज आणि विविध समुदायांच्या लोकांची एकता समजू शकत नाहीत. पाकिस्तान स्वत:च्या देशात मुलांच्या विरोधात सातत्याने होत असलेल्या गुन्ह्यांवरून सुरक्षा परिषदेचे लक्ष हटविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारताने केला आहे.
दहशतवादाला रोखण्यासाठी आणि मुलांच्या रक्षणासाठी आम्हाला एकत्रितपणे काम करावे लागणार आहे. याकरता दहशतवादी आणि त्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात सदस्य देशांना कठोर कारवाई करावी लागणार आहे. मुलांच्या विरोधात गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर दया दाखविली जाऊ नये असे आवाहन भारतीय प्रतिनिधीने केले आहे.
भारतात उत्तम कार्य
युएन महासचिव गुतेरेस यांनी चिल्ड्रन अँड आर्म्ड कॉन्फ्लिक्ट 2023 च्या अहवालातून भारताचे नाव हटविले आहे. याकरता त्यांनी भारतात मुलांच्या रक्षणासाठी उचलण्यात आलेल्या प्रभावी पावलांचा दाखला दिला होता. भारत सरकार मुलांसाठी चांगले कार्य करत आहे आणि आम्ही त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो असे गुतेरेस यांनी म्हटले आहे.









