संयुक्त राष्ट्रसंघात भारताने चांगलेच सुनावले
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या आपत्कालीन बैठकीत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. भारतीय प्रतिनिधी प्रतीक माथूर यांनी भारत पाकिस्तानच्या चिथावणीला बळी पडणार नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्यांची पाठराखण करणारा देश असल्याचे विधान माथूर यांनी संयुक्त राष्ट्रसंघात केले आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचे प्रतिनिधी मुनीर अकरम यांनी रशिया-युक्रेन युद्धाची तुलना काश्मीर प्रश्नासोबत केली होती.
भारत यावेळी पाकिस्तानच्या चिथावणीला कुठलेच प्रत्युत्तर देणार नसल्याचे सांगण्यासाठी येथे आलो आहे. पाकिस्तानच्या प्रतिनिधीने राइट ऑफ रिप्लाय अंतर्गत यापूर्वी आम्ही दिलेल्या उत्तराचा अभ्यास करावा असा माझा सल्ला आहे. पाकिस्तानने स्वतःचा इतिहास पहावा, दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश म्हणून त्याची ओळख आहे. जागतिक दहशतवादी घोषित असूनही पाकिस्तानात संबंधितांना शिक्षा केली जात नसल्याचे माथूर यांनी सुनावले आहे.
भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न अत्यंत निराशाजनक आणि चुकीचा आहे. संघर्ष आणि कलहावर तोडगा काढण्यासाठी शांतता हाच एकमात्र मार्ग असू शकतो यावर आम्ही दोन दिवसांच्या चर्चेनंतर सर्वजण सहमत झालो असताना पाकिस्तानने चिथावणी देणे चुकीचे असल्याची टीका भारतीय प्रतिनिधीने केली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने युक्रेनवर महासभेच्या प्रस्तावावर आपत्कालीन विशेष बैठक बोलाविली होती. यादरम्यान पाकिस्तानचे प्रतिनिधी मुनीर अकर यांनी जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाची तुलना काश्मीर प्रश्नासोबत केली होती. परंतु त्यानंतर भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानच्या या निरर्थक टिप्पणीची निंदा करत संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठाचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर गुरुवारी भारताने स्वतःच्या राइट ऑफ रिप्लायचा वापर करत पाकिस्तानला फटकारले आहे.
मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची यादी
2021-22 मध्ये भारताने सुरक्षा परिषदेतील स्वतःच्या कार्यकाळादरम्यान पाकिस्तानात लपून बसलेल्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची यादी तयार केली होती. यात अब्दुल रहमान मक्की (लष्कर-ए-तोयबा), अब्दुल रौफ असगर (जैश-ए-मोहम्मद), साजिद मीर (लष्कर-ए-तोयबा), शाहिद महमूद (लष्कर-ए-तोयबा) आणि तल्हा सईद (लष्कर-ए-तोयबा) यांचा समावेश होता. लष्कर-ए-तोयबाच्या अब्दुल रहमान मक्कीला जानेवारी महिन्यात जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले होते.









