संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने सुनावले खडे बोल : कुणाला उपदेश देऊ नका
वृत्तसंस्था/जिनिव्हा
संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेत भारताने पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. मानवाधिकार परिषदेच्या 58 व्या सत्राच्या सातव्या बैठकीत भारताने पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र म्हटले आहे. पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय दान अन् देणगीवर निर्भर असलेला देश आहे. दहशतवाद्यांना थारा देणारा पाकिस्तान सातत्याने असत्य फैलावत आहे. हे अपयशी राष्ट्र ओआयसीचा वेळ देखील वाया घालवत आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने इतरांना उपदेश देण्याची गरज नसल्याचे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानचे नेते आणि प्रतिनिधी स्वत:च्या सैन्य दहशतवादी परिसरातून असत्याला सातत्याने फैलावत असल्याचे पाहणे अत्यंत दुर्दैवी आहे.
पाकिस्तान ओआयसीला स्वत:च्या मुखपत्राच्या स्वरुपात वापरत त्याची एकप्रकारे चेष्टा करत असल्याचे वक्तव्य संयुक्त राष्ट्रसंघातीय भारताच्या स्थायी मिशनचे क्षितिज त्यागी यांनी केले आहे. ओआयसीचा वेळ एक अपयशी देश वाया घालवत असल्याचे पाहणे दुर्दैवी आहे. हा देश आंतरराष्ट्रीय सहाय्यावर जिवंत आहे. पाकिस्तानची वक्तव्यं ढोंग, अमानवीयता आणि अक्षमतेने युक्त आहेत. भारत लोकशाही, प्रगती आणि स्वत:च्या लोकांसाठी सन्मान सुनिश्चित करण्यावर केंद्रीत आहे. या मूल्यांबद्दल पाकिस्तानने शिकवण घ्यावी असे त्यागी यांनी सुनावले आहे.
जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग
जम्मू-काश्मीर आणि लडाख नेहमीच भारताचा अविभाज्य भाग म्हणून कायम राहतील. मागील काही वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये अभूतपूर्व राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगती बरेच काही सांगून जाणारी आहे. हे यश दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने पीडित या क्षेत्रात सामान्य स्थिती आणण्यासाठी सरकारच्या प्रतिबद्धतेवरील लोकांच्या विश्वासाचा पुरावा असल्याचे त्यागी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानात मानवाधिकारांचे उल्लंघन, अल्पसंख्याकांचे शोषण आणि लोकशाहीवादी मूल्यांचे पद्धतशीर उल्लंघन राज्याच्या धोरणांचा हिस्सा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून प्रतिबंधित दहशतवाद्यांना निर्लज्जपणेआश्रय पुरविणाऱ्या पाकिस्तानने इतरांना उपदेश करू नयेत, अशा शब्दांत त्यागी यांनी शेजारी देशाला सुनावले आहे.
उत्तर देण्याचा अधिकाराचा वापर
भारताने पाकिस्तान विरोधात स्वत:च्या उत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर केला आणि ही टिप्पणी पाकिस्तानच्या असत्य फैलावण्याच्या कृतीला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 19 फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथानेनी हरीश यांनी जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहणार असल्याचे पाकिस्तानला सुनावले होते.
क्षितिज त्यागी कोण?
क्षितिज त्यागी हे 2012 च्या तुकडीचे आयएफएस अधिकारी आहेत. ते जानेवारीपासून जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेतील भारताच्या स्थायी मिशनमध्ये कौन्सिलर आहेत. यापूर्वी ते येथील भारताच्या स्थायी मिशनमध्ये प्रथम सचिव म्हणून कार्यरत होते. त्यागी यांनी आयआयटी खडगपूर येथून थर्मल एनर्जी आणि पर्यावरण इंजिनियरिंगमध्ये एमटेक पूर्ण केले आहे.









