ढाकामध्ये आयोजन : मैत्रीचे नवे पर्व सुरू
वृत्तसंस्था/ढाका
बांगलादेश आणि पाकिस्तानने गुरुवारी सुमारे 15 वर्षांच्या अंतरानंतर परराष्ट्र सचिव स्तरावरील परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत आयोजित करून व्यापार संबंधांवर लक्ष केली. तसेच द्विपक्षीय मुद्यांच्या इतर अनेक विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांच्या ढाका दौऱ्याच्या काही दिवस आधी ही बैठक झाल्याने दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे नवे पर्व सुरू झाल्याचे दिसत आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तेत असताना ढाका-इस्लामाबाद संबंधांची स्थिती फारच वाईट होती. मात्र, आता युनूस यांच्या नेतृत्त्वातील अंतरिम सरकारने सत्ता हाती घेतल्यावर संबंधांना सकारात्मक वळण मिळत आहे. जवळपास 15 वर्षांच्या अंतरानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशमधील उच्चस्तरीय चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव आमना बलोच 17 एप्रिल रोजी ढाका येथे झालेल्या परराष्ट्र कार्यालय सल्लामसलतमध्ये (एफओसी) सहभागी झाल्या होत्या.
तसेच बांगलादेशच्या वतीने परराष्ट्र सचिव मोहम्मद जशीम उद्दीन एफओसीमध्ये उपस्थित होते. गेल्या दशकाहून अधिक काळानंतर दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळांच्या चर्चेची ही पहिलीच बैठक होती. दोन्ही बाजूंनी परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रांवर चर्चा करण्यात आल्याचे समजते. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची एफओसी 2010 मध्ये झाली होती. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव जशीम उद्दीन आणि पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव आमना बलोच यांनी पद्मा येथील राज्य अतिथीगृहात झालेल्या ‘एफओसी’ दरम्यान आपापल्या बाजूचे नेतृत्व केले. आता या महिन्याच्या अखेरीस दार यांचा ढाका दौरा नियोजित आहे. 2012 नंतर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांचा बांगलादेशला पहिलाच दौरा असेल. आमना बलोच या दौऱ्यात मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस आणि परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहिद हुसेन यांचीही सदिच्छा भेट घेणार आहेत.









