300 हून अधिक लोक मृत्यूमुखी, असंख्य बेपत्ता, बचावकार्यात अडथळे, आणखी आपत्तीची शक्यता
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानच्या उत्तर आणि मध्यभागांना अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसला असून आतापर्यंत 300 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. अद्याप शेकडो लोक बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 48 तासांमध्ये पुराच्या संकटाने उग्रस्वरुप धारण केले असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आणखी अतिवृष्टीची शक्यता आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे. नद्यांना महापूर आला असून अनेक लोक वाहून गेले आहेत. बचाव कार्याला प्रारंभ करण्यात आला असला, तरी ते तुटपुंजे ठरत आहेत. अनेक स्थानांवर बचावकार्य पूर्ण थांबले असल्याने लोकांच्या त्रासात भर पडली आहे. पाकिस्तानच्या नेत्यांनी या नैसर्गिक आपत्तीमुळे त्रासलेल्या लोकांना सहानुभूती दर्शविली आहे.
शनिवारी 9 ठार
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे वृत्त आहे. शेकडो घरे संततधार पावसाने कोसळली असून निकामी झाली आहे. हजारोंच्या संख्येने नागरीक बेघर होत आहेत. त्यांच्यासाठी आसरा गृहे बनविण्यात आली असली तरी अपुरी पडत आहेत. स्थानिकांमध्ये घबराट पसरली असून प्रशासनाने परिस्थिती नीट हाताळली नाही, असे आरोप नागरीकांकडून केले जाऊ लागले आहेत. पाकव्याप्त काश्मीरात शनिवारी दुपारपर्यंत 9 लोकांचा बळी गेला होता.
बनेर, बाजापूरमध्ये ढगफुटी
गेल्या 48 तासांमध्ये पाकव्याप्त काश्मीरातील बनेल आणि बाजापूर येथे अतिवृष्टी आणि पुराचा कहर झाला. बनेर आणि बाजापूरमध्ये ढगफुटीमुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. डोंगरमाथ्यावरील पाणी वेगाने खाली येत असल्याने अनेक घरे वाहून गेली असून असंख्य लोक पडलेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. त्यांच्या वाचविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
खैबर पख्तुनख्वामध्ये कहर
पाकिस्तानच्या वायव्येला असणाऱ्या खैबर तख्तुनख्वा प्रांतातली अनेक गावे नष्ट झाली आहेत. या प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गाडापूर यांनी पत्रकारांना या संकटाची माहिती दिली. या प्रांतात सर्वाधिक जीवीतहानी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी अतिदक्षतेचा इशारा देत लोकांना सुरक्षित स्थानी जाण्याची सूचना केली. मात्र, असंख्य लोकांकडे स्वत:ची वाहने नसल्याने आणि सरकारी तसेच खासगी संस्थांची सार्वजनिक वाहतूक वाहने बंद असल्याने अनेक नागरीकांना आहे त्याच स्थानी राहण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी एक दिवसाच्या शोकाची घोषणा केली.
पंजाबमध्ये 255 ठार
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात पावसाने आणि पुराने धुमाकूळ घातला आहे. या प्रांतात गेल्या तीन दिवसांमध्ये 255 जणांचा बळी गेला. या प्रांतातील शाळा आणि सार्वजनिक कार्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असून काही शाळांमध्ये पूरपिडितांच्या राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. या प्रांतात मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 73 टक्के अधिकचा पाऊस झाल्याची माहिती आहे.
हवामान बदलामुळे आपत्ती
यंदा अनेक देशांमध्ये पावसाळ्यात मोठे नैसर्गिक उत्पात घडले आहेत. हवामानात होत असलेला बदल आणि जागतिक तापमान वाढ यांच्यामुळे निसर्गाचे चक्र बिघडले आहे. त्यामुळे अतिवृष्टी होत असून ती एकाच भागात जास्त होण्याची शक्यता वाढली आहे. जागतिक तापमान कमी करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर सर्व देशांनी त्यांचे तापमान कमी करण्यासाठी निर्णायक पावले उचवावीत असे आवाहन विविध पर्यावरण तज्ञांनी लोकांना केले आहे.
पाकिस्तानमध्ये हाहाकार
ड पाकव्याप्त काश्मीर, खैबर पख्तुनखा आणि पंजाब प्रातांमध्ये कहर
ड अनेक लोक ढिगाऱ्यांखाली अद्यापही अडकलेले, बचावकार्य मंतगती
ड पंजाब प्रांतात मृतांची संख्या 255, आतील सर्व नद्यांना मोठा पूर
ड स्थानिक प्रशासनांकडून पूरग्रस्त-मृतांचे कुटुंबिय यांच्याकडे दुर्लक्ष









