पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पुरेपूर प्रतिशोध घेतल्यानंतर भारताने पाकिस्तानला पुन्हा जबर तडाखा दिला आहे. भारताने 7 मेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे अभियान यशस्वी करुन दाखविल्यानंतर पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ला करण्याचा केविलवाणा आणि हास्यास्पद प्रयत्न करुन पाहिला. मात्र, भारताने आपल्या अजोड युद्धसामर्थ्याने तो हाणून तर पाडलाच, पण पाकिस्तानातील सर्वात महत्त्वाच्या लाहोर शहराची वायुहल्ला सुरक्षा व्यवस्था नष्ट करुन पाकिस्तानला एक गंभीर इशारा दिला आहे. पुन्हा भारताची कळ काढण्याचे दु:साहस कराल तर लाहोर तुम्हाला गमवावे लागेल, हा संदेशच जणू भारताने पाकिस्तानला या कार्यवाहीतून दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांमधील 48 तासांमध्ये जो संघर्ष झाला आहे, त्यातून भारताचे, भूदल, वायुदल आणि नौदल या तन्ही युद्धक्षेत्रातील वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. भारताने सिंदूर अभियान साकारल्यानंतर पाकिस्तानकडून काहीना काही कारवाई होणार हे निश्चित होते. त्यामुळे भारताची संरक्षण व्यवस्था पाकिस्तानचा संभाव्य हल्ला मोडून काढण्यासाठी सज्जच होती. अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानने हल्ला केल्याक्षणीच भारताची अत्याधुनिक संरक्षण यंत्रणा कामाला लागली आणि पाकिस्तानचे सर्व मनसुबे उध्वस्त झाले. पाकिस्तानची अनेक ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे भारताच्या सजग आणि अत्याधुनिक रडार यंत्रणेमुळे धाराशायी झाली आहेत. आधुनिक युद्धव्यवस्थेत पाकिस्तान भारताच्या किती मागे आहे, हेच यातून जगाला दिसून आले आणि पाकिस्तानचे आणखीनच हसे झाले. आतातरी पाकिस्तान या अनुभवातून शहाणपणा शिकेल आणि भारताविरोधात आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा स्वत:च्या देशाची ढासळलेली स्थिती सावरण्याकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, पाकिस्तानचे लष्कर आणि त्याचे प्रशासन यांचा टोकाचा भारतद्वेष पाहता ही अपेक्षा फोल ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तिचा अर्थ असा की, जेव्हा विनाशकाळ जवळ येतो, तेव्हा शहाणपणा विसरला जातो. पाकिस्तानची आजची स्थिती या म्हणीसारखी आहे. आपली लायकी काय आणि आपण कोणाला दुखावत आहोत, याचे त्या देशाचे भान सुटले आहे. ‘आमची 130 अण्वस्त्रे भारताच्या दिशेने तोंड करुन सज्ज आहेत’ अशी बढाई मारणारा पाकिस्तान आज भारतावर एक ड्रोनही धडपणे टाकू शकत नाही, हे वास्तव त्या देशाने स्वत:च सिद्ध करुन दाखविले आहे. यापुढेही त्या देशाची खुमखुमी जाणार नसेल, तर भारतालाही पाकिस्तानवर निर्णायक घाव घालण्याचा अधिकार आपोआपच प्राप्त होणार आहे. भारताने आपल्याकडे भरपूर सामर्थ्य असूनही पाकिस्तान किंवा कोणत्याही शेजारी देशाची कधीही कळ काढली नाही. शेजारी देशांची भूमी किंवा सार्वभौमत्व यांच्याकडे आशाळभूत दृष्टीने कधी पाहिले नाही. तरीही, भारताच्या संयमाची आणि सभ्यतेची परीक्षा बघण्याचा उद्दामपणा पाकिस्तानला करायचाच असेल, तर त्याची जीवघेणी किंमत त्या देशाला मोजावी लागेल, हे गेल्या दोन दिवसांमधील घटनांवरुन स्पष्ट झाले आहे. भारतानेही आता पाकिस्तानची कंबर तोडण्याची कृती करुन आपली शक्ती जगाला दाखविण्याची आवश्यकता आहे. भारताच्या सुदैवाने आज आपल्या देशात एक असे केंद्र सरकार आहे, की जे कधीही भारताचा अवमान सहन करत स्वस्थ बसणार नाही. जागतिक शांतता, मानवतावाद, अहिंसा इत्यादी केवळ पुस्तकांमध्ये आणि चर्चासत्रांमध्ये शोभणाऱ्या अवास्तव, पलायनवादी आणि भोंगळ भ्रमजंजाळांमध्ये अडकून पडून देशाला दुर्बल बनविणारे आणि त्या दुर्बलतेचाच वृथा आणि आत्मघातकी अभिमान बाळगणारे हे सरकार नाही. हे सरकार एका ठोशास दोन ठोसे आणि एका आघातास दोन प्रतिघात या न्यायाने चालणारे सरकार आहे. उरी दहशतवादी हल्ला त्यानंतर 2019 चा पुलवामा हल्ला आणि आता 2025 चा निरपराध पर्यटकांवर, त्यांचा धर्म विचारुन करण्यात आलेला इस्लामी दहशतवादी हल्ला, या तिन्ही महत्त्वाच्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात जी तत्परता आणि व्यवहारवाद दाखविला, तोच 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर किंवा त्याच काळात घडलेल्या इतर अनेक दहशतवादी हल्ल्यानंतर दाखविला असता, तर आज कदाचित परिस्थिती अधिक शांततामय असती. ‘तुम्हाला शांतता हवी असेल, तर युद्धसज्ज रहा’ अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. प्रत्येक स्वतंत्र देशाच्या सरकारने ती समजून घेणे आवश्यक आहे. विशेषत: ज्या देशाला पाकिस्तान आणि चीन यांच्यासारखे विद्वेषी मनोवृत्तीचे, उपद्रवी आणि नतद्रष्ट शेजारी लाभले आहेत, अशा भारतासारख्या देशाने तर आपली संरक्षण आणि आक्रमण व्यवस्था सदैव युद्धसज्जच ठेवली पाहिजे. ‘लातोंके भूत बातेंसे नही मानते’ या न्यायाप्रमाणे शांतीपाठाचा जप करुन स्वत:चा घात करुन न घेता, शत्रूला त्याची जागा दाखवून देण्याचे राजकर्तव्य मानले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार हे कर्तव्य निष्ठेने आणि तत्परतेने करीत आहे. अशा सरकारला सर्वांनी क्षुद्र राजकीय मतभेद, गळेकापू सत्ताकांक्षा आणि व्यक्तीविद्वेषाचे राजकारण बाजूला सारुन सहकार्य करावयास हवे. विरोधी पक्षांनी तशा सहकार्याचे वचन दिले आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. तथापि, याचे पक्षांचे काही नेते अश्लाघ्य आणि विकृत पद्धतीने केवळ भारत सरकारचाच नव्हे, तर भारतीय सेनादलांचाही अवमान करणारी कृती आणि वक्तव्ये करीत आहेत, हे घृणास्पद आहे. विरोधी पक्षांनी आपल्या अशा नेत्यांवर कठोर कारवाई करावयास हवी. तशी न केल्यास या देशातील सूज्ञ जनता अशा पक्षांना ‘निवडणूक युद्धा’त त्यांची योग्य जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित. सध्याच्या कालखंडात सर्वांनीच समंजपणाने वागून देशाची एकात्मता, अखंडता आणि सार्वभौमत्व यांच्या संरक्षणासाठी एकजुटीने उभे रहावे आणि देशाच्या शत्रूंना आपल्या वज्रमुठीचे दर्शन घडवावे. कित्येकदा, शस्त्रांनीही जे काम होत नाही, ते केवळ एकजुटीने होते, असा अनुभव आहे. तेव्हा प्राप्त परिस्थितीत सर्वांनी वैचारिक प्रौढत्वाला महत्त्व दिले पाहिजे.
Previous Articleवॉरेन बफे : नवे पर्व
Next Article सुहास शेट्टी अन् तणावग्रस्त किनारपट्टी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








