वृत्तसंस्था/ बहारीन
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे प्रमुख गुलाम नबी आझाद यानी पाकिस्तानसंबंधी मोठे वक्तव्य केले आहे. जगातील सर्व देशांमध्ये मिळून जितके दहशतवादी नसतील, त्याहून अधिक दहशतवादी एकट्या पाकिस्तानात आहेत. भारतात एकजुटता आहे, तर पाकिस्तान विभागला गेला असल्याचे उद्गार आझाद यांनी बहारीन दौऱ्यादरम्यान केले आहे.
भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वात बहारीन येथे पोहोचलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सामील गुलाम नबी आझाद यांनी भूमिका मांडली आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षांचे असू शकतो, परंतु येथे आम्ही भारतीय म्हणून आलो आहोत. पाकिस्तान धर्माच्या नावावर निर्माण झाला, परंतु तो स्वत:ला एकजूट ठेवू शकला नाही, असे आझाद यांनी म्हटले.
ऑपरेशन सिंदूर केवळ दहशतवाद्यांच्या विरोधात
भारताचे ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकाच्या विरोधात नव्हते, तर तेथे असलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात होते. आमच्या सैन्याने पाकिस्तानच्या नागरिकांना नुकसान पोहोचणार नाही याची पूर्ण काळजी घेतली, केवळ दहशतवादी मारले गेले आहेत. परंतु दुर्दैवाने पाकिस्तानने भारताच्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केल्याचे आझाद यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेजारी देशांसोबत चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जो कौतुकास्पद आहे. आमच्या सर्व पंतप्रधानांनी पाकिस्तान समवेत सर्व शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवेळी भारताला दहशतवादाचा सामना करावा लागल्याचे उद्गार आझाद यांनी काढले आहेत. बहारीनमध्ये प्रत्येक धर्म आणि समुदायाचे लोक कुठल्याही भेदभावाशिवाय राहतात आणि बहारीन ‘मिनी इंडिया’प्रमाणे वाटत असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे.









