आंदोलकांच्या बऱ्याच मागण्या सरकारकडून मान्य
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकव्याप्त काश्मीरमधील सरकारविरोधक आणि पाकिस्तान सरकार यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या करारात आंदोलकांच्या बऱ्याच मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले काही आठवडे मोठ्या प्रमाणात आंदोलने होत असून लक्षावधी लोक रस्त्यांवर उतरले आहेत. पाकिस्तान सरकारने या भागातील जनतेचे शोषण चालविले आहे. त्यांच्यावर अत्याचार केले जात असून त्यांना जीवन जगणे कठीण पेले जात आहे, असा आरोप आहे.
या भागातील आवामी कृती समितीने पाकिस्तानच्या शहाबाझ शरीफ सरकारच्या विरोधात चक्काजाम आणि शटर्स डाऊन आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला या भागात अभूतपूर्व प्रतिसादही मिळाला होता. गेल्या 75 वर्षांमध्ये झाली नव्हती, एवढी उग्र आंदोलने गेल्या दोन महिन्यांमध्ये झाली आहेत. अखेर पाकिस्तान सरकारला या आंदोकांसमोर नमते घ्यावे लागले आहे, असे दिसून येत आहे.
तोडग्यासाठी प्रयत्न
या आंदोलनांनी गेल्या दोन दिवसांमध्ये उग्र स्वरुप धारण केले होते. ते दडपून टाकण्यासाठी प्रथम पाकिस्तान सरकारने लष्करी बळाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. या कारवाईत 12 नागरीकांचा बळी गेला. तथापि, आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला. तसेच आंदोलनाची व्याप्तीही वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे पाकिस्तान सरकारला एक पाऊल मागे येत आंदोलनकर्त्या संघटनेशी चर्चा करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद येथे आपले प्रतिनिधीमंडळ पाठवावे लागले. या मंडळाने आवामी कृती समितीच्या नेत्यांशी चर्चा करुन तोडग्याच्या अटी निश्चित केल्या. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये करार करण्यात आला आहे. आंदोलकांनी त्यांच्या 38 मागण्यांची एक सूची सरकारला सादर केली आहे. या सूचीतील बहुतेक मागण्यांना करारात स्थान दिले गेल्याची माहिती आहे.









