जागतिक स्तरावर पाकिस्तानची बाजू मांडणार
इस्लामाबाद :
पाकिस्तानचे माजी विदेशमंत्री बिलावल भुट्टो भारतासोबत अलिकडेच निर्माण झालेल्या तणावावरून जागतिक स्तरावर पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भुट्टो यांना ही जबाबदारी सोपविली आहे. पंतप्रधान शरीफ यांनी संपर्क केला होता, आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी पाकिस्तानची बाजू मांडणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ही जबाबदारी मिळाल्याने गौरवान्वित वाटत असल्याचे उद्गार भुट्टो यांनी काढले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कायम आहे आणि तणाव कमी करण्याच्या दिशेने घडामोडी घडत आहेत एक रोडमॅप तयार असून त्याचे आम्ही पालन करत आहोत. पुढील पाऊल चर्चा असून आम्ही यासाठी तयार आहोत असे पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी म्हटले आहे.
भारत शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचे अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी फोन करून सांगितले होते. आम्ही सकारात्मक प्रतिक्रिया दिली, परंतु भारत पुन्हा हल्ला करत असेल आम्ही प्रत्युत्तर देऊ असे अमेरिकेला कळविले होते असा दावा डार यांनी केला आहे. इशाक डार यांनी तुर्कियेचे विदेशमं‰ाr हकन फिदान यांच्याशी फोनवरून चर्चा करत परस्पर संबंध मजबूत करणे आणि क्षेत्रीय शांतता तसेच सुरक्षा वाढविण्याच्या उपायांवर चर्चा केली आहे.
पाक राष्ट्रपतींनी घेतली सैनिकांची भेट
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी गुजरांवाला छावणीचा दौरा करत पाकिस्तानी सैनिकांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री मोहसिन नकवी होते. राष्ट्रपती झरदारी यांचे स्वागत सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनी केल्याचे पाक सैन्याकडून सांगण्यात आले.
इराणच्या राष्ट्रपतींशी संपर्क
तर दुसरीकडे शाहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यादरम्यान त्यांनी पाकिस्तान-भारत संघर्ष रोखण्यासाठी इराणने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. भारत-पाकिस्तान तणाव वाढला असता इराणने दोन्ही देशांदरम्यान मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता. याचबरोबर तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान यांनी काश्मीर मुद्द्यावर शाहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली आहे. काश्मीर मुद्दा निकाली काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे म्हणत एर्दोगान यांनी पुन्हा एकदा स्वत:ची भारतविरोधी भूमिका दाखवून दिली आहे.









