फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन कंपनीने केले स्पष्ट : पाकिस्तानचा दावा ठरविला खोटा
वृत्तसंस्था/ पॅरिस
राफेल लढाऊ विमान पाडविल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याची पोलखोल आता होऊ लागली आहे. लढाऊ विमान तयार करणाऱ्या फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीकडून पाकिस्तानने भारताकडील एकही राफेल लढाऊ विमान पाडविले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी भारताच्या संरक्षण सचिवांनी देखील राफेल पाकिस्तानकडून पाडविण्यात आले नसल्याची पुष्टी दिली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबविले होते, ज्याच्या अंतर्गत पाकिस्तान अन् पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अ•dयांना लक्ष्य करण्यात आले.
फ्रान्सची न्यूज वेबसाइट ‘एव्हियन दे चेस्से’ला दसॉल्ट एव्हिशएनचे अध्यक्ष आणि सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी एका राफेल लढाऊ विमानात उंचीवर पोहोचल्यावर तांत्रिक समस्या निर्माण झाली होती, ज्यामुळे ते कोसळले. तर पाकिस्तानसोबतच्या संघर्षादरम्यान राफेल लढाऊ विमान कोसळले नव्हते, असे स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताची राफेल लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडविल्याचे म्हणणे चुकीचे आहे. पाकिस्तानचा दावा खरा नसल्याचा भरवसा मी देऊ शकतो. भारताच्या तुलनेत पाकिस्तानला जीवित अन् आर्थिक हानी कितीतरी पट अधिक सहन करावी लागली आहे. पाकिस्तानात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत, असे संरक्षण सचिव आर.के. सिंह यांनी म्हटले आहे. भारतीय सशस्त्र दलांना ऑपरेशनदरम्यान पूर्ण मोकळीक देण्यात आली होती. आमच्या सशस्त्र दलांवर कुठलीच राजनयिक बंधने नव्हती, तर त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होते, असेही संरक्षण सचिवांनी स्पष्ट केले आहे.
चीनवर भडकले फ्रेंच अधिकारी
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान फ्रान्सनिर्मित राफेल लढाऊ विमानांच्या कामगिरीविषयी चीनने भ्रमाची स्थिती निर्माण करण्याची जबाबदारी स्वत:च्या दूतावासांना सोपविली होती. चीन राफेल लढाऊ विमानांच्या प्रतिष्ठा अन् विक्रीला नुकसान पोहोचवू पाहत होता. याप्रकरणी फ्रान्सच्या सैन्य अन् गुप्तचर अधिकाऱ्यांनी स्वत:च्या अहवालात निष्कर्ष काढत चीनच्या कृतीबद्दल संताप व्यक्त केला आहे. चीनच्या दूतावासांमधील डिफेन्स अताशेंनी राफेलच्या विक्रीला प्रभावित करण्यासाठी अभियान चालविले, फ्रान्सच्या लढाऊ विमानांची ऑर्डर दिलेल्या देशांना या व्यवहारापासून रोखणे हा चीनचा उद्देश होता. खासकरून इंडोनेशियाला राफेल विमान खरेदी करण्यापासून रोखण्याचा अन चीनमध्ये निर्मित विमानांची निवड करण्यासाठी ड्रॅगनकडून प्रयत्न करण्यात आले होते.
पाकिस्तानचा खोटा दावा
पाकिस्तानच्या वायुदलाने सैन्य संघर्षादरम्यान 5 भारतीय लढाऊ विमानांना पाडविले, ज्यात तीन राफेल लढाऊ विमाने सामील होती, असा दावा पाकिस्तानने केला होता. पाकिस्तान अन् चीनच्या या दाव्यांमुळे फ्रान्सकडून निर्मित राफेल लढाऊ विमानांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित झाले होते. फ्रान्सला देखील याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागत आहे. फ्रान्सच्या कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आता भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षाबद्दल अधिक माहिती मिळू शकणार आहे.









