…तरच भारत-पाकिस्तान दरम्यान शांतता
अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत रिजवान सईद यांनी अमेरिकेकडे काश्मीर मुद्द्यावर हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. काश्मीर हाच भारत-पाकिस्तान यांच्यातील वादाचे कारण आहे. काश्मीर मुद्दा निकाली न निघाल्यास दोन्ही देशांच्या संबंधांवर तो प्रभाव पाडत राहील असे सईद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी अद्याप स्थायी नाही. पाकिस्तानने नेहमीच संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार जम्मू-काश्मीरचा मुद्दा आणि शांततापूर्ण तोडग्याचे समर्थन केले असल्याचा कांगावा पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने केला आहे. तसेच पाकिस्तान विदेश कार्यालयाने आंतरराष्ट्रीय समुदायाला आगामी काळात भारताच्या कारवाईवर बारकाईने नजर ठेवण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने देखील 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेला भारताला कारवाई रोखण्याचे आवाहन करण्याची विनंती केली होती. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे काश्मीर मुद्दा निकाली काढण्यास अमेरिकेने पुढाकार घ्यावा असे पाकिस्तानने म्हटले होते.
भारतीय मुत्सद्द्याला देश सोडण्याचा आदेश
पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासाच्या एका अधिकाऱ्याला पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले. हा अधिकारी अवैध कारवायांमध्ये सामील होता असा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानने भारतीय दूतावासाचे चार्ज डी अफेयर्स (प्रभारी मुत्सद्दी)ला विदेश मंत्रालयात पाचारण करत स्वत:ची नाराजी व्यक्त केली होती. या अधिकाऱ्याला 24 तासांत देश सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. यापूर्वी भारताने मंगळवारीच नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकाऱ्याला पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले होते. भारताने या अधिकाऱ्यावर अवैध कृत्यांमध्ये सामील असल्याचा आरोप करत 24 तासांत देश सोडण्यास सांगितले होते.
चिनी उपविदेशमंत्र्यांनी घेतली भेट
चीनचे उपविदेशमंत्री सुन वेइदोंग यांनी चीनमधील पाकिस्तानचे राजदूत खलील हाशमी यांची भेट घेतली. या भेटीत पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाव चर्चा झाली. चिनी विदेश मंत्रालयाने बुधवारी याची माहिती दिली. चीन दोन्ही देशांदरम्यान स्थायी शस्त्रसंधीचे स्वागत आणि समर्थन करतो. याप्रकरणी आम्ही भूमिका पार पाडण्यास तयार आहोत असे चीनच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
भारताबद्दल सतर्क रहा : इम्रान
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत:च्या देशाला भारताच्या कारवाईबद्दल सतर्क राहण्याची सूचना केली आहे. इम्रान यांची बहिण अलीमा यांनी तुरुंगात इम्रान यांची भेट घेतली. यादरम्यान इम्रान यांनी पाकिस्तानने सतर्क रहावे, कारण मोदी अवश्य सूड उगविणार असे म्हटले. माजी पंतप्रधानांनी पाकिस्तानी सैन्याची कारवाई देशाचे मनोबल उंचाविणारी असल्याचे वक्तव्य केले आहे.









