वृत्तसंस्था / इस्लामाबाद
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा, अशी सूचना पाकिस्तानने हा पुरस्कार देणाऱ्या नोबेल समितीकडे केली आहे. ट्रंप यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकताच झालेला सशस्त्र संघर्ष थांबविण्यात साहाय्य केले आहे. त्यामुळे संभाव्य अणुयुद्ध टळले आहे. त्यामुळे ते नोबेल पारितोषिकाचे मानकरी होण्यास पात्र आहेत, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.
ही मागणी पाकिस्ताने चार दिवसांपूर्वीही केली होती. आता त्या देशाने तशी सूचना नोबेल समितीला करुन पुढचे पाऊल उचलले आहे. यासंबंधीचे वक्तव्य पाकिस्तान प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विशेष बाब ही आहे, की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष या दोन देशांच्या नेतृत्वांनीच संमजसपणा दाखवून थांबविला आहे, असे स्पष्ट विधान डोनाल्ड ट्रंप यांनी दोनच दिवसांपूर्वी केले आहे. त्यांनी हे श्रेय आता स्वत:कडे घेतलेले नाही.









