सामनावीर अब्रार अहमद : 9 धावांत 4 बळी
वृत्तसंस्था / शारजाह
सध्या येथे सुरू असलेल्या पुरूषांच्या तिरंगी टी-20 मालिकेतील सामन्यात पाकच्या फिरकी गोलंदाज अब्रार अहमदने 9 धावांत 4 गडी बाद केल्याने पाकने युएईचा 31 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले.
पुढील आठवड्यात होणाऱ्या आशिया चषक पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात पाक संघातील फख्र झमानने 44 चेंडूत नाबाद 77 धावा झोडपल्या. डावखुऱ्या फख्र झमानचे टी-20 प्रकारातील 15 सामन्यानंतरचे हे पहिले अर्धशतक आहे. पाकने निर्धारीत 20 षटकात 5 बाद 171 धावा जमविल्या. युएई संघाने 20 षटकात 7 बाद 140 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. या स्पर्धेत अफगाणने 4 गुण मिळविले असून त्यांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना युएई बरोबर होत आहे.
फिरकी गोलंदाज अब्रार अहमदच्या अचूक गोलंदाजीसमोर युएई संघाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. डिसोजाने 14 चेंडूत 9 धावा केल्या. हर्षित कौशिक डावातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला. अमिरातची 15 षटकाअखेर स्थिती 5 बाद 102 अशी होती. युएई संघातील सलामीच्या शराफुने 51 चेंडूत 68 धावा जमविल्या.
तत्पूर्वी पाकच्या डावामध्ये झमान आणि मोहम्मद नवाज यांनी सावध खेळी केली. मोहम्मद नवाजने नाबाद 37 धावा केल्या. झमान आणि मोहम्मद नवाज यांनी सहाव्या गड्यासाठी शेवटच्या 51 चेंडूत 91 धावा झोडपल्या. नवाजने डावातील 19 व्या षटकात तीन सलग चौकार तसेच 1 उत्तुंग षटकार ठोकला.









