वृत्तसंस्था / दुबई
सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील कराचीत बुधवारी झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तान संघाला षटकांची गती राखता न आल्याने या संघाला दंड करण्यात आला आहे.
न्यूझीलंडने या सामन्यात पाकचा 60 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली होती. या सामन्यामध्ये मैदानावरीलपण रिचर्ड किटलबॉरो आणि शरफुदौला तसेच तृतिय पंच जोयल विल्सन आणि चतुर्थ पंच अॅलेक्स व्हार्फ यांनी पाक संघावर षटकांची गती राखता न आल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानंतर सामनाधिकारी अॅन्डी पायक्रॉप्ट यांनी या अहवालाची माहिती घेतल्यानंतर पाकचा कर्णधार मोहम्मद रिझवानला दोषी ठरविले आहे. आता आयसीसीच्या शिस्तपालन नियमानुसार संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या मानधनातील 5 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. 1996 नंतर प्रथमच आयसीसीच्या या प्रमुख स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱ्या पाक संघाला हा दंड द्यावा लागणार आहे. आता पाकचा संघ रविवारी दुबईत होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर कर्णधार रिझवान व त्याचे सहकाऱ्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे.









