चौकशीत पोलिसांना आढळले भक्कम पुरावे, काडतुसावरुन लागला छडा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील संभल येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर अद्यापही तेथे वातावरण तणावग्रस्त आहे. या शहरातील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरुन निर्माण झालेल्या वादामुळे ही दंगल घडली होती. या दंगलीत 5 दंगलखोरांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. आता या दंगलीचे पाकिस्तान कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस या मुद्द्याचीही चौकशी करत आहेत.
घटनास्थळाचा तपास करत असताना पोलिसांना एक काडतूस मिळाले होते. या काडतुसाची तपासणी केली असता ते पाकिस्तामध्ये उत्पादित करण्यात आले आहे, असे आढळून आल्याने त्यादृष्टीने तपासाची दिशा परिवर्तीत करण्यात आली. त्यामुळे या संबंधातील नवे पुरावे सापडले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
सहा काडतुसे मिळाली
दंगल ज्या स्थानी घडली त्या परिसरात पोलिसांनी सखोल तपास केला असता त्यांना आणखी सहा रिकामी काडतुसे तर दोन भरलेली काडतुसे आढळली. या सर्वांवर त्यांची निर्मिती पाकिस्तानात झाल्याच्या नोंदी होत्या. त्यामुळे ही दंगल पाकिस्तान पुरस्कृत होती का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
नेम चुकल्याने पुरावा सापडला
संभल येथे दंगलीत एका गटाच्या लोकांनी दुसऱ्या त्याच धर्माच्या गटांमधील लोकांवर गोळ्या झाडल्याने ही दंगल उसळली होती. त्यामुळे या दंगलीत झालेल्या 5 जण प्राणांस मुकले होते. त्यांचा मृत्यू गोळीबारात झाला होता. मात्र, वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गोळीबाराचा आदेश दिलेला नव्हता. असे असतानही गोळीबार कोणी केला, हा मुद्दा उपस्थित झाला होता. प्राथमिक चौकशीत ही दंगल एकाच धर्माच्या दोन परस्परविरोधी गटांमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले होते.
गोळ्या पोलिसांच्या नाहीत
पोलिसांच्या गोळीबारात पाच मृत्यू झाल्याचे वृत्त प्रथम पसरले होते. तथापि, नंतर या गोळ्यांचे परीक्षण केले असता त्या पोलिसांच्या शस्त्रांमधून झाडण्यात न आल्याची बाब स्पष्ट झाली आहे. गोळीबारासाठी उपयोगात आणलेली पिस्तुले पोलिसांची नसल्याचेही निष्पन्न झाले होते. त्यामुळे तपासाला वेगळे वळण मिळाले.
पाकिस्तान बनावटीची काडतुसे
या दंगलीत दंगलखोरांनी खासगी पिस्तुलांचा उपयोग केला होता. या पिस्तुलांमध्ये पाकिस्तानी बनावटीच्या काडतुसांचा उपयोग केल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे या सर्व प्रकरणाला आणि त्याच्या चौकशीला कलाटणी मिळाली आहे. पाकिस्तानची काडतुसे भारतात आली अशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्या दिशेने पोलिस तपास करत असून आणखी धक्कादायक वास्तव लवकरच प्रकाशात येईल, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली. पाकिस्तानने भारतात हिंसाचार पसरविण्याचा व्यापक कट केला आहे काय आणि तो कितपत खोलवर आहे, याचा आता शोध घेतला जात आहे.









