नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक नवी दिल्लीत सुरू आहे. या बैठकीत पाकिस्तानचाही सहभाग अपेक्षित आहे. भारताचे एनएसए अजित डोवाल यांनी बैठकीला सुरूवात केली असून त्यात चीनचे एनएसए सहभागी होऊ शकतात. पाकिस्तानमध्ये सध्या एनएसए नियुक्त नसल्यामुळे या बैठकीला वरिष्ठ संरक्षण अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. यापूर्वी 21 मार्च रोजी पाकिस्तानने ‘एससीओ’च्या चर्चासत्रात भाग घेतला नव्हता. या चर्चासत्रात लष्करी वैद्यक, आरोग्यसेवा आणि साथीच्या आजारांमध्ये सशस्त्र दलांच्या योगदानावर चर्चा करण्यात आली.
भारतात होणाऱ्या एससीओ बैठकीमध्ये पाकिस्तान सहभागी होण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. एससीओ बैठकीनंतर परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 4-5 मे रोजी गोव्यात होणार आहे. एससीओ बैठकीसाठी भारताकडून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री एससीओ बैठकीसाठी भारतात येण्यास तयार आहेत. तसे झाले तर जुलैमध्ये होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेसाठी पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफही भारतात पोहोचण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.
आम्ही सध्या एससीओचे अध्यक्ष आहोत. यासंदर्भात आम्ही सर्व सदस्य देशांना बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. या बैठकांमध्ये सर्व देशांनी सहभाग घ्यावा अशी आमची अपेक्षा असल्याचे पाकिस्तानला एससीओ बैठकीसाठी आमंत्रित करण्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.









