कानपूरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून सेनास्तुती
वृत्तसंस्था / कानपूर
भारतीय सेनादलांच्या पराक्रमासमोर हतबल झालेल्या पाकिस्तानला अखेर भारतासमोर लोळण घ्यावी लागली आहे. ‘सिंदूर’ अभियानात भारताने त्या देशाला त्याची खरी जागा दाखविली. त्यामुळे त्याला शस्त्रसंधीची विनवणी करावी लागली. हे यश भारतीय सेनादलांचे आहे, अशी प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका जाहीर सभेत भाषण करताना शुक्रवारी केली आहे.
कानपूर येथे त्यांनी भारताच्या शस्त्रनिर्मिती केंद्राची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी एका जाहीर सभेत भाषण केले. सिंदूर अभियानाची माहिती त्यांनी दिली. पाकिस्तानशी झालेल्या या संघर्षात भारताच्या ‘स्वदेशी’चे सामर्ध्य जगासमोर आले आहे. भारताच्या स्वदेशनिर्मित संरक्षण साधनांनी पाकिस्तानला गुढघ्यावर वाकावयास भाग पाडले. देश संरक्षणसामग्री निर्मितीत स्वयंपूर्ण होणे किती महत्वाचे आहे, हे या संघर्षावरुन स्पष्ट झाले आहे. आत्मनिर्भरता ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तर उपयुक्त आहेच, पण देशाचे संरक्षण आणि देशाचा सन्मान यांच्यासाठीही ती तितकीच महत्वाची आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
ब्राम्होसची निर्मिती उत्तर प्रदेशात
या संघर्षात भारताच्या ज्या क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या लष्कराची झोप उडविली होती, त्या ब्राम्होस क्षेपणास्त्राचा नवा पत्ता उत्तर प्रदेश हा आहे. कारण उत्तर प्रदेशात या क्षेपणास्त्राच्या निर्मितीचे केंद्र स्थापन करण्यात येत आहे. आगामी काळात उत्तर प्रदेश भारताच्या शस्त्रास्त्रनिर्मितीचे एक महत्वाचे केंद्र बनणार आहे. येथून उत्पादित केल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांमुळे भारताची आवश्यकता तर पूर्ण होणार आहेच, पण येथून भारतनिर्मित शस्त्रास्त्रे इतर देशांना निर्यातही केली जाणार आहेत. यातून देश बळकट होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परिवारवादावर टीका
त्यांनी भाषणात काँग्रेस आणि समाजवादी पक्ष या उत्तर प्रदेशातील पक्षांवर टीका केली. हे परिवारवादी पक्ष आहेत. त्यांच्या काळात उत्तर प्रदेशमधून उद्योगांचे अन्य राज्यांमध्ये पलायन होत होते. आमच्या डबल इंजिन सरकारने राज्याची मोठी औद्योगिक प्रगती केली आहे. लोकांसाठी रोजगार आणि देशासाठी आर्थिक सामर्थ्य हे दोन्ही ध्येये साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
बिहारमध्ये राजदवर हल्लाबोल
कानपूरच्या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये एका जाहीरसभेतही लोकांना संबोधित केले. सासाराम येथील या सभेत त्यांनी ‘सिंदूर’ अभियान यशस्वी करण्यासाठी सैन्यदलांना धन्यवाद दिले. तसेच स्वदेशी शस्त्रांनी पाकिस्तानला कसे जेरीस आणले ही माहितीही दिली. प्रत्येक क्षेत्रांमध्ये अधिकाधिक आत्मनिर्भरता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था भक्कम होणार आहे. आमच्या देशाच्या संरक्षणव्यवस्था विदेशी तंत्रज्ञान आणि सामग्रीवर अवलंबून असता कामा नये, हे आमचे सूत्र आहे. भविष्यकाळात आम्ही स्वदेशीवर अधिकाधिक भर देणार आहोत, ही बाब त्यांनी स्पष्ट केली.
नक्षलींचाही बंदोबस्त
केवळ पाकपुरस्कृत दहशतवादच नव्हे, तर आम्ही भारतातील नक्षलवादाचा नायनाट करण्याच्या चंग बांधला आहे. काही दशकांपूर्वी सासाराम येथे नक्षलींचा मोठा प्रभाव होता. त्यांचे भय सर्वसामान्यांना वाटत होते. पण, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमुळे लोकांची नक्षलींच्या संकटापासून सुटका झाली. इतर राज्यांमध्येही आम्ही नक्षलींना उखडण्यासाठी प्रयत्नशील असून आम्हाला यश येत आहे. सर्वसामान्यांचा आमच्यावर विश्वास आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.









