आशिया चषक स्पर्धेसंबंधी भारताकडून स्पष्टीकरण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ले करत असताना त्या देशाची क्रिकेट सामने का खेळले जातात, असा प्रश्न संसदेतील चर्चेत विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. तथापि, आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हेच दोन मुख्य प्रतिस्पर्धी आहेत. भारताने पाकिस्तानशी खेळायचे नाही, असा निर्धार केल्यास पाकिस्तानच्या पदरात विनासायास हा चषक टाकल्यासारखे होणार आहे, असे प्रतिपादन क्रिडा विभागातील सूत्रांकडून करण्यात आले आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय मालिका नव्हे. ती आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. द्विदेशीय मालिका आणि बहुदेशीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांच्यातील अंतर समजून घेणे आवश्यक आहे. समजा, ऑलिंपिक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान समोरासमोर आले, तर पाकिस्तानशी आम्ही खेळणार नाही, असे म्हणता येईल काय, असा प्रश्न सूत्रांनी केला आहे.
आशियायी चषक परिस्थिती
आशियायी चषक क्रिकेट स्पर्धेतील स्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. या स्पर्धेत क्रिकेट खेळणारे आशिया खंडातील मान्यताप्राप्त देश भाग घेतात. पण मुख्य संघर्ष भारत आणि पाकिस्तानमध्येच असतो. आतापर्यंत याच दोन संघांनी ही स्पर्धा जास्तीत जास्त वेळा जिंकली आहे. अशावेळी पाकिस्तानवर बहिष्कार टाकल्यास त्या देशाला अतिरिक्त गुण अपोआप मिळण्याची स्थिती उद्भवते. तसे झाल्यास त्या देशाला फारसे प्रयत्नही न करता हा चषक जिंकण्याची संधी प्राप्त होते. हे टाळण्यासाठीच भारताने या स्पर्धेत पाकिस्तानशी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानचा सहभाग असल्यास भारत त्या स्पर्धेवर किंवा पाकिस्तानवर बहिष्कार टाकत नाही, असे प्रतिपादन सूत्रांनी केले.
चुरशीचा संघर्ष होण्याची शक्यता
यंदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानशी संघर्ष होणार आहे. तो चुरशीचा होईल अशी दाट शक्यता आहे. सध्या दोन्ही संघांमध्ये महत्वाची परिवर्तने होत आहेत. त्यामुळे त्यांच्यातील संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेटप्रेमी या संघर्षाची औत्सुक्याने प्रतीक्षा करीत आहेत.









