विश्वचषक क्रिकेट : 6 गड्यांनी विजय, सामनावीर रिझवान, शफीकची शतके, हसन अलीचे 4 बळी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
सामनावीर यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने क्रँपशी मुकाबला करीत नोंदवलेले झुंजार नाबाद शतक आणि केवळ पाचवा वनडे सामना खेळणाऱ्या अब्दुल्ला शफीकचे शतक यांच्या बळावर पाकने येथे झालेल्या विश्वचषकातील हाय स्कोरिंग सामन्यात लंकेवर 6 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला. 4 गुणांसह त्यांनी आता पदकतक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या लंकेने कुसल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमा यांच्या शानदार शतकांच्या जोरावर श्रीलंकेने पाकला विजयासाठी 345 धावांचे आव्हान दिले होते. लंकेने 50 षटकांत 9 बाद 344 धावा जमविल्या. पाकच्या हसन अलीने चार गडी बाद केले. त्यानंतर पाकने 10 चेंडू बाकी ठेवत 4 बाद 345 धावा जमविल्या शानदार विजय साकार केला. इमाम उल हक व बाबर आझम 37 धावांत तंबूत परतल्यानंतर शफीक व रिझवान यांनी तिसऱ्या गड्यासाठी 176 धावांची भागीदारी करीत पाकला विजयाची संधी निर्माण करून दिली. शफीकने 103 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारांसह 113 धावा फटकावल्या. रिझवानला दोनदा पायात गोळे येण्याचा व पाठदुखीचा त्रास झाला. तरीही त्याने निवृत्त न होता खेळ पुढे चालू ठेवला आणि संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. तो 121 चेंडूत 8 चौकार, 3 षटकारांसह 131 धावांवर नाबाद राहिला. त्याने सौद शकीलसमवेत केवळ 68 चेंडूत 95 धावांची भागीदारी केली. शकील 30 चेंडूत 31 धावा काढून बाद झाला. रिझवानने नंतर इफ्तिखार अहमदसमवेत 37 धावांची अभेद्य भागीदारी करीत विजय साकार केला. इफ्तिखार 10 चेंडूत 22 धावांवर नाबाद राहिला. लंकेची स्वैर गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचाही पाकला लाभ झाला. अवांतराच्या रूपात पाकला 26 धावा मिळाल्या. मदुशनकाने 2, पथिराना व थीक्षना यांनी एकेक बळी मिळविले. पथिरानाने 9 षटकांत तब्बल 90 धावा दिल्या.
कुसल मेंडिस व समरविक्रमा यांची शतके
या स्पर्धेत पाकने यापूर्वी पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली होती. मंगळवारच्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण डावातील दुसऱ्या षटकातच लंकेचा सलामीचा फलंदाज कुसल परेरा आपले खाते उघडण्यापूर्वी हसन अलीच्या गोलंदाजीवर रिझवानकडे झेल देत तंबूत परतला. त्यानंतर निसांका आणि कुसल मेंडिस यांनी सावध फलंदाजी करत एकेरी आणि दुहेरी धावावर अधिक भर देत धावफलक हलता ठेवला. लंकेचे पहिले अर्धशतक 53 चेंडूत फलकावर लागले पहिल्या पॉवर प्लेच्या 10 षटकात लंकेने 58 धावा जमवताना एक गडी गमवला.
निसांका आणि मेंडिस यांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 46 चेंडूत नोंदवली. कर्णधार बाबर आझमने गोलंदाजीत वारंवार बदल केला पण त्याला लंकेची ही जोडी 18 व्या षटकात फोडण्यात यश मिळाले. लंकेचे शतक 99 चेंडूत फलकावर लागले. निसांकाने 58 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह अर्धशतक झळकवले. त्यानंतर कुसल मेंडिसने अर्धशतक 40 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. या जोडीने शतकी भागीदारी 93 चेंडूत पूर्ण केली. शदाब खानने निसांकाला शफीककडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 61 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह 51 धावा जमवल्या.
निसांका बाद झाल्यानंतर मैदानात फलंदाजीस आलेल्या सदिरा समरविक्रमाने कुसल मेंडिसला चांगली साथ दिली. या जोडीने संघाला सुस्थितीत नेले. समरविक्रमा आणि मेंडिस यांनी आक्रमक खेळ करीत अर्धशतकी भागीदारी 29 चेंडूत केली. तर लंकेचे दीडशतक 131 चेंडूत फलकावर लागले. कुसल मेंडिसने या स्पर्धेत लंकेतर्फे सर्वात जलद शतक झळकवण्याचा बहुमान मिळवला. त्याने 65 चेंडूत 4 षटकार आणि 13 चौकारांसह शतक पूर्ण केले. लंकेच्या 200 धावा 165 चेंडूत पूर्ण झाल्या तर समविक्रमा आणि कुसल मेंडिस यांनी तिसऱ्या गड्यासाठीची शतकी भागीदारी 67 चेंडूत नोंदवली. समरविक्रमाने आपले अर्धशतक 1 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने 43 चेंडूत पूर्ण केले. 29 व्या षटकात पाकच्या हसन अलीने कुसल मेंडिसला इमाम उल हक करवी झेलबाद केले. त्याने 77 चेंडूत 6 षटकार आणि 14 चौकारांसह 122 धावा झोडपल्या. पाकच्या हसन अलीने लंकेच्या असालंकाला केवळ एका धावेवर झेलबाद केले. लंकेची यावेळी स्थिती 30.1 षटकात 4 बाद 229 अशी होती.
धनंजय डिसिल्वा आणि समरविक्रमा यांनी पाचव्या गड्यासाठी 65 धावांची भागीदारी केली. लंकेच्या 250 धावा 212 चेंडूत नेंदवल्या गेल्या. तसेच समरविक्रमा आणि डिसिल्वा यांनी अर्धशतकी भागीदारी 58 चेंडूत नोंदवली. मोहमद नवाजने डिसिल्वाला आफ्रिदीकरवी झेलबाद केले. त्याने 34 चेंडूत 3 चौकारांसह 25 धावा जमवल्या. समरविक्रमाने आपले शतक 82 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने झळकविले. समरविक्रमाचे हे वनडेतील पहिले शतक आहे. लंकेला शेवटच्या पॉवर प्लेच्या 10 षटकात 61 धावा जमवता आल्या पण त्यांनी 5 गडी गमवले. कर्णधार शनाका शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 18 चेंडूत 12 धावा जमवल्या. समरविक्रमा 48 व्या षटकात तंबूत परतला. हसन अलीने त्याला रिझवानकरवी झेलबाद केले. पाकच्या हॅरीस रौफने लंकेच्या थीक्षनाचा खाते उघडण्यापूवीच शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूत त्रिफळा उडवला. त्यानंतर रौफने वेलालगेला डावातील शेवटच्या चेंडूवर झेलबाद केले. त्याने 8 चेंडूत 1 चौकारासह 10 धावा जमवल्या. पथिराना एका धावेवर नाबाद राहिला. लंकेला अवांतराच्या रुपात 14 धावा मिळाल्या. लंकेच्या डावात 9 षटकार आणि 36 चौकार नोंदवले गेले. पाकतर्फे हसन अलीने 71 धावात 4, रौफने 64 धावात 2, तर शाहिन आफ्रिदी, नवाज आणि शदाब खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : लंका 50 षटकात 9 बाद 344 (निसांका 1 षटकार आणि 7 चौकारांसह 61 चेंडूत 51, कुसल मेंडिस 77 चेंडूत 6 षटकार आणि 14 चौकारांसह 122, समरविक्रमा 89 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह 108, डिसिल्वा 34 चेंडूत 3 चौकारांसह 25, शनाका 12, वेलालगे 1 चौकारांसह 10, अवांतर 14, हसन अली 4-71, रौफ 2-64, आफ्रिदी, नवाज आणि शदाब खान प्रत्येकी एक बळी.
पाकिस्तान 48.2 षटकांत 4 बाद 345 : शफीक 103 चेंडूत 113, इमाम उल हक 12, बाबर आझम 10, रिझवान 121 चेंडूत नाबाद 131, शकील 31, इफ्तिखार अहमद 10 चेंडूत नाबाद 22, अवांतर 26. दिलशान मदुशनका 2-60, पथिराना 1-90, थीक्षना 1-59.









