तिरंगी मालिकेतील पहिल्या टी 20 सामन्यात पाकचा विजय : सामनावीर सलमान आगाची अर्धशतकी खेळी
वृत्तसंस्था/ दुबई
तिरंगी टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 39 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने कर्णधार सलमान आगाच्या अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तानसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना संपूर्ण अफगाणिस्तान संघ 143 धावांवर ऑलआऊट झाला. अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने 243.75 च्या स्ट्राईक रेटसह 16 चेंडूत 39 धावांची शानदार खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक 4 बळी घेतले.
प्रारंभी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकची सुरुवात चांगली झाली. पॉवरप्लेमध्ये संघाने 1 विकेट गमावून 54 धावा केल्या. टॉप-3 फलंदाज चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकले नाहीत. साहिबजादा फरहान 10 चेंडूत 21, सॅम अयुब 14 तर फखर जमान 20 धावांवर बाद झाले. यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार सलमान आगाने मात्र शानदार खेळी साकारताना 36 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारासह नाबाद 53 धावा केल्या. या दरम्यान, त्याला मोहम्मद नवाज (21), मोहम्मद हॅरिस (15) यांची चांगली साथ मिळाली. पाकिस्तानच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 182 धावा उभारल्या. अफगाणकडून फरीद अहमदने दोन विकेट घेतल्या, तर रशीद-मुजीबसह 4 गोलंदाजांनी 1-1 विकेट घेतली.
अफगाण फलंदाजांची निराशा
183 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाण संघाला पहिला धक्का बसला जेव्हा शाहीन आफ्रिदीने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इब्राहिम झदरान (9) ला बाद केले. यानंतर, रहमानउल्लाह गुरबाजने 38, सेदिकुल्लाह अटलने 23 आणि दरविश रसूलीने 21 धावा करून लहान डावात संघाला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. तथापि, मधल्या फळीच्या अपयशामुळे अफगाणिस्तानची धावसंख्या घसरली. रशीद खान आठव्या क्रमांकावर आला. त्याने 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 39 धावा करून संघाला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला. तो बाद झाल्यानंतर अफगाणिस्तान संघ पूर्ण 20 षटकांपर्यंतही टिकू शकला नाही. संघाचा डाव 19.5 षटकांतच 143 धावांत संपुष्टात आला. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने सर्वाधिक 4 बळी घेतले. दरम्यान, तिरंगी मालिकेतील दुसरा सामना आज शारजाहमध्येच पाकिस्तान आणि यूएई यांच्यात खेळला जाणार आहे.









