चॅम्पियन्स करंडक स्पर्धा : विजयाने सांगता करण्याची दोघांचीही इच्छा अपूर्ण
वृत्तसंस्था/रावळपिंडी
येथे झालेल्या संततधारेमुळे यजमान पाकिस्तान व बांगलादेश यांच्यात होणारा चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना एकेक गुण बहाल करण्यात आला. या स्पर्धेत पावसामुळे रद्द झालेला हा दुसरा सामना आहे. याआधी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांचा सामना रद्द झाला होता. या दोन्ही संघांना साखळी फेरीत भारत व न्यूझीलंड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला असल्याने ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून याआधीच बाहेर पडले आहेत. त्यामुळे या सामन्याला फक्त औपचारिका स्वरूप प्राप्त झाले होते. चॅम्पियन्स मोहिमेची सांगता विजयाने करून थोडीफार पत राखता यावी, याच हेतूने दोन्ही संघ सामना खेळणार होते. या दोन्ही संघांना आता एकेक गुण मिळाला आहे.
पाकिस्तानसाठी ही स्पर्धा एकदम निराशाजनक ठरली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्यांना न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुबईतील सामन्यात भारताकडून ते 6 गड्यांनी पराभूत झाले. या पराभवामुळे त्यांच्यावर स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ आली. बांगलादेशला आपल्या पहिल्या सामन्यात भारताकडून पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशचे माफक आव्हान भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले होते. नंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 5 गड्यांनी त्यांना पराभूत केले. त्यामुळे भारत व न्यूझीलंड यांचे उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित झाले. गुरुवारचा शेवटचा सामना जिंकून स्पर्धेची सांगता करावी, एवढाच हेतू दोन्ही संघांचा होता. पण पावसामुळे ही इच्छाही अधुरी राहिली. आता दक्षिण आफ्रिका, अफगाण व ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरी गाठण्यासाठी चुरस असेल.









