सॅम पित्रोदांकडून पुन्हा वादग्रस्त वक्तव्य : काँग्रेसला अडचणीत आणणार
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा पुन्हा एकदा स्वत:च्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. पित्रोदा यांनी आता पाकिस्तानवरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमध्ये गेल्यावर घरासारखी जाणीव होते असे म्हणत पित्रोदा यांनी भारताचे विदेश धोरण शेजारी देशांवर केंद्रीत असायला हवे असे म्हटले आहे. शेजारी देशांसोबत आमच्या संबंधांमध्ये आम्ही सुधारणा करू शकतो का? मी पाकिस्तानात राहिलो आहे आणि तेथे मला घरासारखे वाटते. मी बांगलादेशातही राहिलो आहे आणि नेपाळमध्ये देखील मला घरात पोहोचल्यासारखे वाटते. या देशांमध्ये गेल्यावर विदेशी भूमीवर असल्याचा विचार मनात येत नसल्याचे वक्तव्य पित्रोदा यांनी केले आहे.
देशाच्या युवांनी राहुल गांधींसोबत उभे राहण्याची विनंती मी करत आहे. राहुल गांधींचा आवाज युवांनी बुलंद करावा असे पित्रोदा यांनी म्हटले आहे. तर तत्पूर्वी राहुल गांधी यांनी जेन झेडला पुढे येत देशाच्या लोकशाहीचे रक्षण करण्याचे आवाहन केले होते.
पित्रोदा हे स्वत:च्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. मागील वर्षी त्यांनी भारत अत्यंत विविधतायुक्त देश असून येथे पूर्व भारतात राहणारे लोक चीनच्या लोकांसारखे, पश्चिमेकडे राहणारे लोक अरबांसारखे, उत्तरेत राहणारे श्वेतांप्रमाणे आणि दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसत असल्याचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांना इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच मागील वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी पित्रोदा यांनी काँग्रेस सत्तेवर आल्यास कुणाकडे किती संपत्ती आहे याचे सर्वेक्षण करविण्यात येणार असल्याचे विधान केले होते. पित्रोदा यांच्या या विधानाचा काँग्रेसला निवडणुकीत मोठा फटका बसला होता.









