नूरखान वायुतळावरील ब्राह्मोस हल्ल्याने पाकिस्तान भयभीत
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्याने अचूक हल्ल्यांद्वारे पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील नूर खान वायुतळाला लक्ष्य केले होते. यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. याचमुळे पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय आता रावळपिंडीतून हलविले जाणार आहे. पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयाला जीएचक्यू म्हटले जाते, आता हे मुख्यालय इस्लामाबादमध्ये हलविले जाणार आहे. पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय सध्या रावळपिंडीच्या चकलाला येथे असून येथून काही किलोमीटर अंतरावर नूर खान वायुतळ आहे.
पाकिस्तानच्या नूर खान वायुतळाला पूर्वी चकलाला वायुतळ या नावाने ओळखले जात होते. हा वायुतळ राजधानी इस्लामाबादनजीक असून देशाचा सर्वात महत्त्वपूर्ण सैन्य अन् व्हीआयपी वायुतळ मानला जातो. परंतु भारताने या वायुतळावर हल्ला करत त्याचे मोठे नुकसान घडविले आहे. हा वायुतळर केवळ पाकिस्तान वायुदलाच्या व्हीआयपी मूव्हमेंट हब नसून येथून अनेकदा स्पेशल ऑप्स आणि एअरलिफ्ट मिशन राबविण्यात आल्या आहेत. याचमुळे भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य भयभीत झाले आहे. आता मुख्यालय रावळपिंडीतून इस्लामाबादमध्ये हलविण्याची तयारी सुरू झाली आहे.
असीम मुनीरचे निवासस्थानही रावळपिंडीत
पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय असण्यासोबत सैन्यप्रमुख असीम मुनीर यांचे निवासस्थानही रावळपिंडीत आहे. भारताने कारवाई सुरू केल्यावर असीम मुनीर हे बंकरमध्ये लपून बसले होते. पाकिस्तानचे न्युक्लियर कमांड सेंटर देखील रावळपिंडीत आहे. भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांद्वारे नूर खान वायुतळावर हल्ला केला होता. भारताने कराचीच्या मलीर कँटवरही हल्ला केला होता.









