भारतावरही केला आरोप : तालिबान विरोधकांची केली हातमिळवणी
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनी अफगाण तालिबानला धमकी दिली आहे. याचबरोबर मुनीर यांनी भारतावर पाकिस्तानला अस्थिर करण्याचा आरोप केला आहे. तालिबानी दहशतवादी पाकिस्तानात घुसू पाहत आहेत, तालिबानने यावर आळा न घातल्यास प्रत्येक पाकिस्तानीच्या रक्ताचा सूड उगविणे आमचे कर्तव्य असल्याचे मुनीर यांनी म्हटले आहे. आम्ही अनेक वर्षांपासून अफगाणांवर दया आणि उपकार केले, परंतु याच्या बदल्यात तालिबानने भारतासोबत मिळून आमच्या विरोधात कट रचला असल्याचा दावा मुनीर यांनी केला आहे. पाकिस्तानी सैन्यप्रमुखांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास असल्याचे म्हटले असले तरीही चीनबद्दल समर्थन व्यक्त केले आहे. आम्ही एका मित्रासाठी दुसऱ्या मित्राचे बलिदान देणार नाही असे मुनीर यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानात सत्तापरिवर्तनावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णपणे खोटे ठरविले आहे.
राष्ट्रपती आसिफ अली झरदारी पद सोडू शकतात, यामुळे सैन्यप्रमुखांना हे पद ग्रहण करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशी पाकिस्तानात चर्चा सुरू आहे. तसेच मुनीर हे पाकिस्तानातील वर्तमान संसदीय प्रणालीला अध्यक्षीय प्रणालीत बदलू पाहत असल्याचे मानले जात आहे.
तालिबानच्या शत्रूंना निमंत्रण
पाकिस्तानात चालू महिन्यात एक महत्त्वाची बैठक होणार असून यात तालिबानच्या विरोधकांन बोलाविण्यात आले आहे. अफगाणिस्तानसाठी अमेरिकेचे माजी विशेष प्रतिनिधी जल्मे खलीलजाद यांनी पाकिस्तान 25-26 ऑगस्ट रोजी अफगाण निर्वासित आणि तालिबानविरोधी नेत्यांची बैठक आयोजित करणार असल्याची माहिती दिली आहे. या बैठकीत सामील होणारे काही नेते हे तालिबानला नष्ट करण्याची योजना आखून आहेत. अफगाण नागरिकांना स्वत:चे राजकीय विचार मांडण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांच्या संमेलनाचे आयोजन करत समर्थन देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न चुकीचा असल्याचे खलीलजाद यांनी म्हटले आहे.









